लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाहतूकीचे नियम तोडल्यानंतर दंडाची रक्कमही थकीत ठेवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक शाखेने व्यापक मोहीम सुरु केली आहे. १ ते ३ डिसेंबर या अवघ्या तीन दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिमेद्वारे ३० लाख ५३ हजार १०० रुपयांच्या ई चलनाची वसूली केली आहे. इतक्या मोठया प्रमाणामध्ये प्रथमच दंडाच्या रकमेची वसूली केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात वाहतूकीचे नियम मोडणाºया वाहन चालकांविरुद्ध १४ फेब्रुवारी २०१९ पासून ई चलान प्रणालीद्वारे कारवाई सुरु झाली. नियम मोडणाºया संबंधित वाहन चालकाला त्या दंडाची रक्कम आॅनलाईन किंवा वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे भरता येते. वारंवार नियम मोडूनही अनेकदा वाहन चालक त्यांच्या दंडाची रक्कम भरत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळेच दंडाची रक्कम न भरणाऱ्यांची वाहने १ डिसेंबरपासून जप्तीचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला होता. त्यासाठी त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर १ डिसेंबरपासून वाहतूक पोलिसांच्या ठाणे, कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर या चार विभागाच्या १८ युनिटमार्फत या कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईत १ डिसेंबर रोजी ७ लाख ७८ हजार ९५० रूपयांच्या दंडाची वसूली झाली. त्यानंतर २ डिसेंबर रोजी ११ लाख ३९ हजार ६५० रुपये तर ३ डिसेंबर रोजी ११ लाख ३४ हजार ५०० रुपयांच्या दंडाची वसूली केली. यामध्ये सर्वाधिक कारवाया या कापूरबावडी, ठाणेनगर, नारपोली, कल्याण, मुंब्रा आणि कळवा या युनिट अंतर्गत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* वाहतूक पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी थकीत दंडाची रक्कम भरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ११ हजार ८२ चलनांचे १९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत तब्बल ३७ लाख ९३ हजार ९०० रूपयांचा दंड वाहन चालकांनी भरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ मुळात, वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण आहे. त्यामुळे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन कोणीही करु नये. अशा नियंमांचे वारंवार उल्लंघन केल्यानंतरही दंड थकीत ठेवणाºयांवर वाहने जप्तीची कारवाई केली जाणार आहे.’’बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर