ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ठाणेनगर युनिटच्या मोकळ्या जागेत पडून असलेल्या बेवारस दुचाकींचा सहायक पोलीस आयुक्तांमार्फत २७ मे रोजी जाहीर लिलाव केला जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी आपल्या वाहनांबाबत माहिती घ्यावी, कोणीही आपल्या कागदपत्रांसह मालकीबाबत दावा न केल्यास या वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने गुरुवारी दिली.
ठाणे शहरातील ठाणेनगर वाहतूक शाखा कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस मिळालेल्या १७ दुचाकी ठेवलेल्या आहेत. त्याबाबत ठाणे शहर वाहतूक शाखेने या वाहनांची तपासणी केली. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या मार्फतही (आरटीओ) या वाहनांच्या मूळमालकांचा शोध घेण्यात आला. परंतु त्यांचा शोध लागलेला नाही. आता ही वाहने नैसर्गिक परिस्थितीमुळे गंजून तसेच सडून पूर्णपणे वापरासही अयोग्य झाली आहेत.
आरटीओने दिलेल्या ९५ हजारांच्या मूल्यांकनानुसार त्यांचा याच रकमेमध्ये लिलाव केला जाणार आहे. या वाहनांचा येत्या २७ मे २०२१ रोजी सकाळी ११ वाजता वाहतूक नियंत्रण शाखेच्या ठाणेनगर उपशाखेच्या मोकळया जागेत जाहीर लिलाव केला जाणार आहे.