- नितीन पंडित भिवंडी - शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली असतानाच शहरात जमा होणारा कचरा डम्पिंग ग्राउंड पर्यंत नेताना खुल्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक केली जात आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने भर पावसात कचऱ्याची उघड्या वाहनातून वाहतूक केली जात आहे.
शहरात तील रस्त्यांवर सध्या प्रचंड खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असतानाच अशा प्रकारे उघड्या वाहनातून कचरा घेऊन जाताना हे वाहन वाहतूक कोंडीत अडकल्यास प्रवाशांना उग्र वास सहन करावा लागत आहे.तर दुचाकी स्वरांच्या अंगावर उघड्या वाहनातील कचरा व दुर्गंधीयुक्त पाणी पाणी पडल्याने वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांना कचरा बंदिस्त करून नेणे आवश्यक असताना देखील भिवंडीतील कचरा वाहतूक करणारे ठेकेदार त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असून मनपा प्रशासनाचेही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांकडून मनपा प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.