ठाणे : सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसाचा बुधवारीदेखील जोर दिसून आला. मागील २४ तासांत ठाणे शहरात ३४.७८ मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी दिवसभरात ६२.७३ मि.मी. पावसाची नोंद झाली. दिवसभर झालेल्या पावसाने झाडे, भिंती पडल्या तर आग लागण्याची आणि पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. यामध्ये १० गाड्यांचे नुकसान झाले. तर एका घरावर वृक्ष पडल्याने घराचे पूर्ण नुकसान झाले. शहरातील सखल भागात सकाळी पाणी साचले होते.
शनिवारी रात्रीपासून ठाण्यात जोर धरलेल्या पावसाने उसंत घेतलेली नाही. बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी दिवसभर अंधार होता. ठाणेकरांना सूर्यदर्शन झाले नाही. बुधवारी दिवसभर पावसाने शहरात बऱ्यापैकी हजेरी लावली. दिवसभरात ६२.७३ मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत ३४.७८ मि.मी. पाऊस झाला. बुधवारी पाणी तुंबण्याच्या अवघ्या दोन तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आल्या. यामध्ये लव-कुश सोसायटी चेकनाका आणि गावदेवी मार्केट नौपाडा येथे पाणी साचले होते. तर ठाणे पोलीस आयुक्तालयाजवळील गुन्हे अन्वेषण विभागाच्या आवारातदेखील पाणी साचले होते. शहरात १५ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये १० गाड्यांचे नुकसान झाले. बाळकुम पाडा १ येथील राम मारुती नगर भागातील एका घरावर वृक्ष पडल्याने घराचे पूर्ण नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. शहरातील तीन ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या. कचराळी तलाव, तलावपाळी, पार्किंग प्लाझा माजिवडा, गावंड भाग या ठिकाणी चार वृक्ष धोकादायक स्थितीत आहेत, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.
..............
वाचली.