- अजित मांडके ठाणे -औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. याचदरम्यान पाठी मागून येणारी कार त्या ट्रक धडकली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी, मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर चांगला परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळाले. या मार्गावर सुमारे एक तास वाहतुक धीम्या गतीने सुरू होती. तसेच ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये ते झाड पडले. या अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून तेथून पलायन केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
नागपूर येथून मुंबई घाटकोपर येथे दहा टन औषध घेऊन ट्रक चालक जगदीश गौतम (40) हा निघाला होता. सकाळी साडेसहाच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉप समोर आल्यावर ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला. आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावरती जाऊन जोरात आदळला. तसेच तो तेथील रस्त्यावरती उलटला. या धडकेत ते झाड ही पडले होते. तसेच त्या अपघातग्रस्त ट्रकच्या मागून येणारे कार ट्रकच्या मागील बाजूस जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात कारमधील चालकासह 5 जणांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते पाच ही जण मुंबई मुलुंडमधील रहिवासी आहेत.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, नौपाडा पोलीस हे ०१-हायड्रा मशीनसह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे ०१-तासापर्यंत रस्त्याच्या एका बाजूने धीम्या गतीने सुरू होती. तर अपघातामुळे रस्त्यावरती पडलेले झाड आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी कापून बाजूला केले. तसेच अपघात ग्रस्त दोन्ही वाहने पोलीस कर्मचाऱ्यांनी ०१-हायड्रो मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यश आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.