- अजित मांडके ठाणे - उत्तर प्रदेश सरकारकडून प्रत्येक ५० हजार रुपये बक्षीस घोषीत केलेल्या खुन्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना सात वर्षानंतर खंडणी विरोधी पथक व एसटीएफ प्रयागराज उत्तरप्रदेश पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आले आहे. मोनु शुक्ला (३०) आणि रजत शुक्ला (२६) यांना अटक करण्यात आले आहे.
या दोघांच्या विरुध्द उत्तर प्रदेश सरकाराने प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस लावले होते. हे दोघे आरोपी ठाण्यातील वसंत विहार परिसरात लपुन राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या कामी ठाणे पोलीसांची मदत मागितली होती. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी एसटीएफ उत्तर प्रदेश यांच्याकडे नमुद आरोपींची इंत्यभुत माहिती मिळवून त्यांचे मोबाइल नंबर मिळवून त्याचे सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण केले असता हे आरोपी निळकंठ वुड्स, मुल्ला बाग ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेतला ते दोघेही या भागात संशयास्पदरित्या फिरतांना आढळून आले. त्यांना या पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, त्यांनी आपली नावे व पत्ता देखील सांगितला. त्यानंतर उत्तर प्रदेश मधील शंकर शुक्ला यांच्या खुन्यात गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली त्यांनी दिली.
दरम्यान या दोघांना १६ आॅगस्ट रोजी रात्री १०.१५ वाजता ताब्यात घेण्यात आला. तसेच पुढील कारवाईसाठी एसटीएफ, प्रयागराज पोलीस उत्तरप्रदेश यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.