- अजित मांडकेठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या तळ अधिक दोन मजली असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दुसरा मजलावरती राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या रुमच्या छताचे प्लास्टर पडून दोन मुली जखमी झाल्या आहेत. ही घटना बुधवारी सकाळी पावणे दहा ते दहा वाजण्याच्या सुमारास खोपट,प्रताप टॉकीज जवळ, ब्रम्हांड सेवा संघाच्या बाजूला घडली. हे शौचालय दहा वर्षे जुने आहे. गौरी संतोष गायकवाड या १३ वर्षीय मुलीच्या डोक्याला शिखा सुनिल कारतीया या १७ वर्षीय मुलीच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. अशाप्रकारे आठवड्यातील दुसरी घटना आहे.
या घटनेची माहिती माजी नगरसेविका नंदा पाटील यांनी दिली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी,उथळसर प्रभाग समिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी धाव घेतली होती. तसेच घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन कक्षा मार्फत धोकापट्टी बांधण्यात आली आहे.अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. ठामपाचे तळ अधिक दोन मजली सार्वजनिक शौचालयाच्या छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उथळसर,आझाद नगर, गोकुळ नगर, या ठिकाणी घडली होती.