- अजित मांडके ठाणे - चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या बिहारमधील प्रशांत कुमार रामबाबू सिंग (२७) आणि प्रेमशंकर लक्ष्मीनारायण ठाकूर (२३) या दुकलीला ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून ३० लाख रुपये किंमतीचे दोन किलो ६० ग्रॅम वजनाचा चरस जप्त केला आहे. तसेच त्यांच्याकडे नेपाळी चलन नोटा मिळाला असून तो चरस ही त्यांनी नेपाळ मधून आणल्याचे प्रथम दर्शी समोर आले आहे. तर येत्या २९ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे रेल्वे स्टेशन, कोपरी पूर्व येथील रस्त्यावर दोघे जण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार, त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दोन किलो ६० ग्रॅम वजनाचा चरस जप्त केला. त्यांनी अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या फायदयाकरीता कब्ज्यात बेकायदेशिररित्या बाळगल्याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे करत आहे.