ठाणे : कोविडकाळात आरोग्यव्यवस्थेतील त्रुटींमुळे अनेक पातळ्यांवर रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णालयांंत अव्वाच्या सव्वा बिले भरावी लागली. ज्या रुग्णांना महात्मा फुले योजनेत मोफत उपचार मिळायला हवे होते, त्यांनादेखील उपचार मोफत मिळाले नाहीत. अशा प्रकारे ९० टक्के रुग्णांना आयुष्यभराची कमाई या साथीच्या काळात गमवावी लागली किंवा कर्जबाजारी व्हावे लागले. अशा रुग्णांना बिलांचा परतावा मिळावा, यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या माध्यमातून जनआंदोलन उभारले जाणार आहे.
अनेक कोरोनाग्रस्त नागरिकांची लूट होऊनही सरकारदरबारी याबाबत काही न्याय मिळण्याची शक्यता नाही. जनकल्याणाची भाषा करणाऱ्या परंतु समर्थ सार्वजनिक आरोग्यव्यवस्था निर्माण न करू शकलेले सरकार व राजकीय पक्ष या लुटीला जबाबदार आहेेत. राजकीय पक्ष या गंभीर परिस्थितीवर शांत असून लोक मात्र कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे ठाणे मतदाता जागरण अभियान अशा सर्व रुग्णांशी संपर्क साधून त्यांनी भरलेल्या मोठ्या रकमेच्या बिलांचा परतावा मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी जनआंदोलन उभारले जाईल, असे अभियानाच्या वतीने सांगण्यात आले.
१० डिसेंबरला सभा वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. मुंबईत जनआरोग्य अभियान या संस्थेच्या वतीने परतावा मिळण्यासाठी आंदोलन उभारण्याची पायरी म्हणून मोठी सभा १० डिसेंबरला होणार असल्याची माहिती अभियानाच्या वतीने देण्यात आली.