- जितेंद्र कालेकर ठाणे - ठाण्याच्या वागळे इस्टेट हनुमान नगरातील वेंकटरमना फूड मे. स्पेशलिटीज लिमिटेड या वेफर्स आणि किस बनविण्याच्या कंपनीला बुधवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास लागल्याची घटना घडली. कंपनीतील चार सिलींडरच्या स्फाेटांमुळे ही आग आणखीनच भडकली. सुटीमुळे कामगार बचावले असून डयूटीवरील एका सुरक्षा रक्षकाचीही सुखरुप सुटका केल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
वेंकटरमना फूड मे. स्पेशलिटीज लिमिटेड या कंपनीला दुपारी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबासह सात टॅंकर, कल्याण डाेंबिवलीचे दाेन, भिवंडी निजामपुराचा एक, मीरा भाईंदरचे दाेन तसेच खासगी सहा टॅंकरच्या मदतीन ही आग आटाेक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी हायराईझ फायर वाहनासह, जम्बो वॉटर टँकर वाहन आणि रेस्क्यू वाहनाचाही उपयाेग करण्यात आला. कंपनीतील कागदी सामान, वेफर्स बनविण्यासाठी ठेवलेला तेलाचा साठा आदींनी अचानक पेट घेतला हाेता. त्यात चार सिलींडर्सचाही स्फाेट झाल्यामुळे ही आग आणखीनच भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानांनीही यावेळी मदतकार्य केले. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास म्हणजे सुमारे साडे चार तासांनी ही आग आटाेक्यात आली. यावेळी गांधी जयंतीनिमित्तच्या सुटीमुळे कंपनीतील सर्व कामगार बचावले. तर कंपनीतील चार सुरक्षा रक्षकांची सुखरुप सुटका केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचेही अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.