ठाणे : सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसाने बुधवारी ठाणे जिल्ह्यास झोडपले. दिवसभरात सरासरी ८७.९६ मिमी पाऊस पडला. दरम्यान, कल्याणमधील रायते पूल पाण्याखाली गेल्याने त्या पुलावरील वाहतूक टिटवाळा, आंबिवली आणि शहाडमार्गे वळवली होती. कोणतीही मोठी घटना जिल्ह्यात घडली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.ठाणे शहरात बुधवारी १०६ मिमी पावसाची नोंद झाली. दुपारी अचानक पावसाचा जोर वाढला. शहरातील सखल भागात पाणी साचून वृक्ष उन्मळून पडल्याच्या काही घटना घडल्याचे ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १०५४ मिमी पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक १८४ मिमीपाऊस उल्हासनगरात नोंदवला गेला. त्यापाठोपाठ अंबरनाथ १७५, मुरबाड १७१, कल्याण १६४, ठाणे आणि भिवंडीत प्रत्येकी १४०, तर शहापूर तालुक्यात ८० मिमी पावसाची नोंद झाली.ठामपा हद्दीत मंगळवारी दिवसभरात १२ ठिकाणी पाणी साचले होते. यामध्ये श्री क्रीडा मंडळाच्या बाजूच्या घरामध्ये आणि सावरकरनगर येथील शांतिवन सोसायटी येथील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. विविध १५ ठिकाणी झाडे पडली. यामध्ये तीन गाड्यांवर झाडे पडली असून त्यामध्ये माजिवडा येथे झालेल्या दुर्घटनेत धंपाल माने (२७) आणि मुकेश शिंदे (३०) हे जखमी झाले. तसेच दोन ठिकाणी घरांवर झाड पडले असून वसंतविहार येथे झालेल्या घटनेत घराचे किरकोळ नुकसान झाले आहे.सकाळपासून १२ ठिकाणी पाणी साचले, तर विविध ९ ठिकाणी झाडे पडली आहेत. यामध्ये एकही झाड गाडी किंवा घरावर पडले नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
जलयुक्त ठाणे, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; ८७.९६ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 3:25 AM