- जितेंद्र कालेकर ठाणे - आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणूका निर्भय तातावरणात पार पडाव्यात यासाठी ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबविले. यामध्ये २० तडीपार गुंडांना अटक करण्यात आली असून शस्त्रांसह अवैध दारु असा तीन लाख ३४ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर मोटार वाहन कायद्यान्वये ७९१ वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सोमवारी दिली.
पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने आणि सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे २०२४ रोजी रात्री ११.३० ते १२ मे रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हे ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमधील पोलिसांसह गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेचे ३१५ अधिकारी आणि एक हजार २३६ पोलिस अंमलदारांनी भाग घेतला. या दरम्यान, एक रिव्हॉल्व्हर, तीन गावठी कट्टे, चार कोयते, दहा सुरे अशी १९ हत्यारे हस्तगत करुन वेगवेगळया पोलिस ठाण्यांमध्ये शस्त्र अधिनियमांतर्गत १९ गुन्हे दाखल करुन १४ गुन्हेगारांना अटक केली. अवैध दारुचे ६७ गुन्हे दाखल करुन दोन लाख ६२ हजार दहा रुपयांची अवैध दारु जप्त करुन ४६ आरोपींवर कारवाई करण्यात आली. तंबाखूजन्य पदाथार्ंच्या अनुषंगाने कोटपा कायद्यान्वये १३६ जणांवर कारवाई झाली. रेकॉर्डवरील २६७ हिस्ट्रीशिटर, १६६ तडीपार आणि १७२ गुंड अशा ६०५ सराईत गुन्हेगारांची चाचपणी करुन त्यांची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये २० तडीपार गुंडांना मोकाट फिरतांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ नुसार वेगवेगळया पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. अंमली पर्दार्थ सेवन करणाऱ्या ४० जणांविरुरद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या दरम्यान ७२ हजार ४५० रुपयांची अवैध शस्त्र आणि दोन लाख ६२ हजार दहा रुपयांची अवैध दारु असा तीन लाख ३४ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाहतूक शाखेचीही कारवाई ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने एक हजार ७९८ लहान मोठी वाहने तपासली. वाहतूकीचे नियम मोडल्याप्रकरणी ७९१ जणांविरुद्ध मोटर वाहन कायद्याखाली दंडात्मक कारवाई करुन सहा लाख ८५ हजार ४५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.