- सुरेश लोखंडेठाणे - जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण व ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना येत्या २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण सहा हजार ६०४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये ३६ मतदान केंद्रे ही सोसायट्यांच्या क्लब हाऊसमध्ये आहेत. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील ५० टक्के म्हणजे तीन हजार ३२५ मतदान केंद्रांचे वेबकास्टींग हाेऊन ते भारतीय निवडणूक आयाेगास या केद्रांतील हालचाली पाहाता येणार आहे.
जिल्ह्यातील या तीन हजार ३२५ मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एक हजार १०७ मतदान केंद्रे असून कल्याण लोकसभा मतदारसंघातील ९९१ आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील एक हजार २२७ मतदान केंद्रांचे वेबकास्टींग हाेणार आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यामधील सर्वाधिक ५११ मतदान केंद्रे आहेत. तर सर्वात कमी मतदार केंद्रे उल्हासनगर विधानसभा मतदार संघात २५१ मतदार केंद्रे आहेत. यामध्ये जिल्ह्यात एकूण १८ मतदान केंद्रे ही महिलांद्वारे चालविण्यात येणार आहेत. तसेच १८ मतदान केंद्रे ही दिव्यांग आणि १८ मतदान केंद्रे ही युवकांद्वारे चालविण्यात येणार आहेत.