लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात अवघा १४ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्याचा परिणाम ठाण्यातील काही भागांना पुढील काळात म्हणजेच पावसाळा सुरु होईपर्यंत पाणी कपतीचा सामना करावा लागणार आहे. त्यानुसार आता पहिले शटडाऊन येत्या २ जून रोजी घेण्यात आले आहे. त्याचा फटका कळवा, मुंब्रा, दिवा,मानपाडा, माजिवडा या पट्ट्याला बसणार आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सध्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता पाणी कपात लागू केली आहे. त्याचा परिणाम ठाणे शहरातील काही महत्वाच्या भागांना बसणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. ठाणे शहरात मार्च पासूनच देखभाल दुरुस्ती असेल किंवा इतर तांत्रिक कामांसाठी वारंवार पाणी कपात करण्यास सुरवात झाली आहे. परंतु ही कपात नसून दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत होता असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान आता मात्र ठाण्यातील काही महत्वाच्या भागांना पाणी कपातीचे चटके सहन करावे लागणार आहेत. एमआयडीसीकडून महिन्यातून १५ दिवसांनी पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार शहरातील काही भागांना त्याचा फटका बसणार आहे. एमआयडीसीकडून ठाण्याला रोज १३५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत आहे. परंतु आता कपात लागू करण्यात आल्याने त्याचा सर्वाधिक फटका कळवा, मुंब्रा, दिवा या भागांना बसणार आहे. विशेष म्हणजे दिव्यात तर यापूर्वीच पाणी संकट ओढावल्याचे दिसून आले आहे. येथील अनेक भागांना आजही पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
अनेक भागांना दोन दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. त्यात आता पाणी कपात लागू करण्यात आल्याने त्याचा आणखी त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागणार आहे. त्या खालोखाल मुंब्रा आणि कळवा देखील आहे. तसेच घोडबंदर पट्यातील कोलशेत, खालचा गाव, वागळे पट्यातील काही भागांना देखील एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना देखील पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्यातही ही पाणी कपात जो पर्यंत पावसाळा योग्यरित्या सुरु होत नाही, तो पर्यंत असणार आहे. त्यामुळे आता पाणी कपात पाऊस चांगला झाल्यावरच रद्द होईल असे चित्र आहे. एकूणच त्याचा परिणाम आता ठाण्यातील महत्वाच्या भागांना देखील बसणार आहे.