ठाणे: शिवसैनिकांची डोकी फोडणा-यांना आता शिवसेनेचे दरवाजे बंद, अशा शब्दांत ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचा खरपूस शब्दांमध्ये समाचार घेत ठाणे हा शिवसेनेचा अभेद्य गड असून शिवसैनिक त्या गडाचे खरे कार्यकर्ते आहेत. ठाणे जिल्हा परिषदेत ५३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेची सत्ता आली. हा राज्याच्या दृष्टीने दिशा देणारा विजय आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात सेनेची एकहाती सत्ता येईल. त्यामध्ये ठाण्याची महत्वाची भूमीका असेल, असा विश्वास ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नवनियुक्त नेते एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील त्यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात व्यक्त केला.शिंदे यांची नेतेपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांच्या वतीने स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवारी नागरी सत्काराचे आयोजन केलेहोते. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना शाखाप्रमुख ते शिवसेनानेते पदापर्यंतच्या प्रवासातील खाचखळगे, अनुभव, केलेले कष्ट, घेतलेली मेहनत आणि वेळप्रसंगी रात्रीचा दिवस करुन शिवसेनेची निवडणूकीत ताकद वाढविण्यासाठी डोळयात तेल घालून सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे दिलेला जागता प्रहारा, प्रसंगी अन्य पक्षातील नगरसेवकांना कसे आपलेसे करुन घेतले याबाबतचा संपूर्ण क्रमच शिवसैनिकांसमोर त्यांनी उलगडून दाखविला.प्रारंभीच सर्व शिवसैनिक हे आतापर्यंतच्या यशाचे मानकरी असल्याचे सांगून आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी हा सन्मान अर्पण करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. राष्टÑीय कार्यकारीणीत नेतेपद मिळाले. सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे मानसन्मान मिळाल्याचेही त्यांनी प्रांजळपणे सांगितले. शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे नेतेपदाचा मान ठाणे जिल्हयाला मिळाला. धर्मवीर आनंद दिघेंचा, शिवसेनेचा ठाणे हा बालेकिल्ला असल्याचे नाते गेल्या अनेक वर्षांपासून तयार झाले. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेले काम कै. दिघेंनी केले. त्यांनी केलेले काम टिकविण्याचे काम आपण करतोय. त्यांनी जे काम केले, त्याबद्दल शिवसेनाप्रमुखही ठाणे आणि दिघे यांचे नाव घ्यायचे. ठाण्यात शिवसेना वाढीचे काम त्यांनीच केले. एकटा एकनाथ शिंदे काहीच करु शकत नाही..................................आपल्या गत काळातील आंदोलनाबाबत बोलतांना प्रतिकूल परिस्थितीतही तेल, साखर, रॉकेलसाठी कसा लढा दिला, याचे स्मरण त्यांनी शिवसैनिकांना करुन दिले. ट्रक चालकांचा संप असूनही १२ ट्रक भरुन साखर ठाण्यात आणली होती. ५ लाखांची रोकड घेऊन ही साखर आणली होती. ती रोकड कशी वारंवार न्याहाळत होतो, हेही त्यांनी सांगितले. शिवसेना तसेच दिघे साहेबांच्या प्रेरणेतून आणि उर्जेतूनच अशी अनेक आंदोलने यशस्वी केली............................बैठकींचा गौप्यस्फोट* शिवसेना एकीकडे आणि इतर सर्व पक्ष एका बाजूला अशी परिस्थिती एका निवडणूकीच्या वेळी होती. अगदी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीपद यांचे वेगवेगळया पक्षांनी आपआपसातच आधीच वाटून घेतले होते. तरीही मोठया मुत्सद्देगिरीने एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत दोन नगरसेवकांना फोडण्यात यश आले. असा एक एक मताचा विजय डोळयात तेल घालून आपल्याकडे कसा खेचला, याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.* ठाणे जिल्हा परिषदेतही अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतच्या असामींच्या नजरा लागल्या होत्या. काही जण महाबळेश्वर येथून थेट गुजरातला जाणार होते. पण त्यांना जाऊ दिले नाही. एकाच दिवशी पनवेल, अलिबाग, गोवा, महाबळेश्वर आणि शेवटी ठाण्याच्या महापौर निवासस्थानी अशा पाच बैठका यशस्वी करुन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक यशस्वी केली. त्यावेळी गोवा येथील हॉटेलातील जेवण सोडून भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या समवेत विमानात फक्त एका सॅन्डविच वर दिवस काढल्याचा प्रसंगही आवर्जून सांगितला. जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्याचे दिघे साहेबांचे स्वप्न होते. तर जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता कधी येईल? अशी उद्धवजींकडून विचारणा होत होती. अखेर ५३ वर्षांनी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यात यश आल्याचे ते म्हणाले. एका सदस्याचे मत मिळविण्यासाठी सर्व पक्ष एकवटले होते. पण यश मिळेपर्यंत कसा पाठपुरावा करावा लागतो, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.* शिवसेनेचा गड अभेद्यछगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे असे एकापेक्षा एक नेते शिवसेनेतून बाहेर पडले. जे गेले त्यांना वाटले, शिवसेना राहणार नाही. पण भुजबळ किंवा राणे यांचे काय झाले? काहींनी सेनेत येण्यासाठीही प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसैनिकांची डोकी फोडली, त्यांना शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. काहीही झाले तरी शिवसेनेचा गड अभेद्यच असल्याचेही ते म्हणाले.कार्यकर्त्यांना जपा..शिवसैनिक, सामान्य कार्यकर्ता ही खरी पक्षाची ताकद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अडचणींना धावून जा. असा सल्लाही त्यांनी नेते आणि पदाधिका-यांना दिला. अनेक संकटे आली. टीकाही झाली. ‘मातोश्री’ अर्थात शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरेंचा हात पाठीशी असल्यामुळे आपण खंबीर राहिलो....................राज्याच्या दृष्टीने दिशा देणारा विजय...ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली. सेनेनेही गडकरी रंगायतन, डॉ. घाणेकर ही नाटयगृह, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह दिले आणि आता लवकरच मेट्रो प्रकल्प साकारतोय. त्यामुळे शिवसेना खोटी आश्वासने देत नाही. भावनेवर नव्हे तर कामावर निवडणूका जिंकते. नवी मुंबई १६ वरुन ३८ नगरसेवक झाले. मीरा भार्इंदर आणि ठाण्यातही चांगली कामगिरी झाली. जिल्हा परिषदेतही सत्ता आली. राज्याच्या दृष्टीने दिशा देणारा हा विजय असून राज्यात सत्ता येण्यासाठी ठाण्याची भूमीका निर्णायक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता जबाबदारी वाढली असल्यामुळे सर्वांनी मिळून राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न साकार करुया, अशी भावनिक सादही त्यांनी शिवसैनिकांना घातली........................................