ठाणे : " लोकसहभागातूनच ठाणे स्मार्ट सिटी होईल " असे उद्गगार जिल्हाधिकारी डॉ . महेंद्र कल्याणकर यांनी काढले . विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात स्मार्ट सिटीज : द रोड अहेड या विषयावर राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर बोलत होते. ठाणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी स्मार्ट सीटीज वरील दोन दिवसीय परिषदेत चर्चिलेल्या शोध निबंधांवर प्रकाश टाकला .
समारोपाच्या भाषणात ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर म्हणाले की, ठाण्याला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी ठाण्यातील नागरीकांनी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिळून एकदिलाने काम करावे लागेल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटी संदर्भात प्रकल्प हाती घेऊन काही महत्वाच्या सूचना प्रशासनाला दिल्या तर शहराचा विकास गतिशील होईल असेही ते म्हणाले. स्मार्ट सिटी वर काम करणाऱ्या सर्वच अभ्यासकांनी, ठाण्यातील नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या अभियानात हिरीरीने भाग घेऊन ठाण्याला सुंदर बनवता येईल असं ते म्हणाले. स्मार्ट ठाणे बनवण्यासाठी स्मार्ट सिटीझन घडवावे लागतील असा संदेश त्यांनी दिला. विद्या प्रसारक मंडळाने दूरदृष्टी दाखवत अत्यंत महत्वाच्या विषयावर ही परिषद भरवली हे कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले. ठाणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांनी "स्मार्ट ठाणे " या विषयावर सादरीकरण केले. ठाण्याच्या भविष्यातील विकासा साठी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. राष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. या परिषदेस संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वेदवती परांजपे यांनी केले व परिषदेच्या समन्वयिका प्रा नीलम शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले .