ठाणे - मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाणे जिल्हाच आमदार ठरवणार आहे. नव्याने नोंदणी झालेल्या या मतदारसंघात यावेळी एक लाख सात हजार २६४ मतदार असून यातील सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यातील आहेत. ठाणे जिल्ह्यात ४५ हजार ८३४ मतदारांची नोंद झाली आहे. या निवडणुकीत तिरंगी लढत असून तिन्ही महत्त्वाचे उमेदवार हे ठाण्यातीलच आहेत, हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे.कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरशीचे रंग भरू लागले आहेत. भाजपाचे निरंजन डावखरे, शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्टÑवादीचे नजीब मुल्ला हे प्रमुख तीन उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपाकडून दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर राष्टÑवादीतर्फे स्वत: शरद पवार रिंगणात उतरले असून ‘गद्दाराला धडा शिकवा’, अशी गर्जना त्यांनी केली आहे. त्यामुळे आता यापैकी कुठल्या नेत्याच्या पारड्यात यश, तर कोणाच्या पारड्यात अपयश टाकायचे, हे ठाणेकर मतदार ठरवणार आहेत.मागील निवडणुकीत या मतदारसंघात ९० हजारांच्या आसपास मतदार होते. त्यावेळेसही ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३५ हजारांच्या आसपास होती. नव्याने मतदारनोंदणी झाली, त्यानुसार या मतदारसंघात आता एक लाख सात हजार २६४ मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या तब्बल ४५ हजार ८३४ आहे. त्याखालोखाल पालघर जिल्ह्यातील मतदारांची संख्या १६ हजार ९८२ एवढी आहे. त्यामुळे या ठिकाणी बविआची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हितेंद्र ठाकूर कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील मतदारांची संख्या ठाण्याखालोखाल म्हणजे १९ हजार ९१८ एवढी आहे. याठिकाणी शेकापचा वरचष्मा असून त्यांनी राष्टÑवादीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. रत्नागिरीत शिवसेनेचे वर्चस्व असून याठिकाणी मतदारांची संख्या १६ हजार २२२ एवढी आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांची संख्या पाच हजार ३०८ एवढी आहे. याठिकाणी नारायण राणे यांचा पगडा असून त्यांच्या स्वाभिमानी पक्षाने निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला आहे. तटकरे यांचे पुत्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना राणे यांचे समर्थन मिळवले होते. तसेच समर्थन आता राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना मिळेल, अशी अपेक्षा बाळगली होती. परंतु, त्यांची ही अपेक्षा फोल ठरली आहे.ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या निवडणुकांचा विचार केल्यास जिल्ह्यात शिवसेना तसेच भाजपाला समसमान यश लाभले आहे. काही ठिकाणी शिवसेना, तर काही ठिकाणी भाजपा वरचढ ठरली आहे.शहापूर तालुक्यात २ हजार ३४० मतदारभातसानगर : कोकण पदवीधर मतदार संघासाठी शहापूर तालुक्यात २ हजार ३४० मतदारांनी आपली नावे नोंदवली असून यामध्ये ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले असले तरी शहापूर तालुक्यातील मतदार निर्णायक ठरणार आहेत. विद्यार्थी बेकारी भत्ता मिळत नाही, तालुक्यात कारखाने मोठ्या संख्येने असून तेथे स्थानिकांना आरक्षण मिळावे यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही अशा येथील समस्या आहेत.भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी स्वाभिमानी पक्षाचे नेते खा. नारायण राणे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली. ही विनंती राणे यांनी मान्य केल्याने तळकोकणातील राणे यांच्या पक्षाने नोंदवलेल्या पदवीधरांची मते डावखरे यांना मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. डावखरे यांच्याकरिता ही लढत अटीतटीची असून, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ठाणे ठरवणार पदवीधर आमदार, मतदार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 4:33 AM