ठाणे : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख आता चौपाट्यांचे शहर म्हणून होणार आहे. पारसिक येथील खाडीकिनाऱ्याला चौपाटीचे रूप देण्याची तयारी पालिकेने केल्यानंतर आता त्याच धर्तीवर नागलाबंदर, कोलशेत व बाळकुम येथेही चौपाटीचा विकास केला जाणार आहे. तसेच येथील गायमुख खाडीचाही विकास केला जाणार आहे. ठाणे महापालिकेने पारसिक खाडीकिनाऱ्यावर अतिक्रमणे हटवल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने या ठिकाणी चौपाटी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ठाण्याला ३२ किमी लांबीचा खाडीकिनारा लाभला असून त्याचे संवर्धन व जतन करण्यासाठी महापालिकेमार्फत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यामधील पारसिक रेती बंदर येथे ४ किमी लांबीचा ४२ एकर जागेत सिंगापूर व साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी विकसित करण्यात येणार आहे. या कामाची ७५ कोटींची निविदा मागवली आहे. या चौपाटीच्या जागेत ३०० अतिक्रमणे निष्कासित करून त्यांचे रेंटल हाउसिंगमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. या कामाच्या आराखड्यात दोन ठिकाणी विसर्जन घाट, अॅम्पी थिएटर, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले एरिया, स्केटिंग, ओपन जिम, खेळाचे मैदान आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी ५० कोटींची तरतूद केली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २ कोटींचे अनुदान मिळाले आहे. दरम्यान, याच धर्तीवर गायमुख, नागलाबंदर, कोलशेत व बाळकुम येथल चौपाट्यांच्या विकासासाठी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट व चौपाटी विकास या लेखाशीर्षांतर्गत ३० कोटींची तरतूद केली आहे. घोडबंदर भागातील गायमुख खाडीजवळील जागा पर्यटनाला चालना देणारे स्थळ म्हणून विकसित करण्याकरिता, २०१६ मध्ये ६.५० कोटी एवढा निधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास वर्ग केला असून उर्वरित निधी मार्च २०१७ मध्ये वर्ग करण्यात येईल. प्रथम टप्प्यातील काम मार्च २०१७ मध्ये होणार असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी २०१७-१८ मध्ये गायमुख विसर्जन घाट विकसित करण्यांतर्गत १० कोटींची तरतूद केली आहे. (प्रतिनिधी)
ठाणे होणार आता चौपाट्यांचे शहर
By admin | Published: April 01, 2017 11:40 PM