ठाणे : पैशांचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना शरीरविक्रयास लावणा-या दलालासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने भिवंडीतून अटक केली. या कारवाईतून १६ आणि १७ वर्षीय दोन मुलींची सुटकाही या पथकाने केली आहे. तिघांनाही ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.भिवंडीच्या संगमपाडा भागात चार हजारांच्या बदल्यात अल्पवयीन मुलींना शरीरविक्रयास लावले जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे संगमपाड्यातील घर क्रमांक ६७ येथे बनावट गिºहाईक पाठवून ‘सौदा’ पक्का झाल्यानंतर ५ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास नाझिया, सुनीता नाईक आणि दलाल राजेशम आडेय (४१) या तिघांना निरीक्षक दौडकर तसेच उपनिरीक्षक सुनील चव्हाण के, जमादार तानाजी वाघमोडे, राजू महाले, हवालदार विजय बडगुजर, कॉन्स्टेबल बेबी मशाळ आणि सरस्वती कांबळे आदींच्या पथकाने जेरबंद केले. त्याच वेळी त्यांनी शरीरविक्रयासाठी आणलेल्या १६ आणि १७ वर्षीय दोन मुलींची त्यांच्या ताब्यातून सुटकाही करण्यात आली. त्यांनी आणखी काही मुलींना या व्यवसायात अडकवले आहे का? त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.असहायतेचा घेतला गैरफायदा...पोलिसांनी सुटका केलेल्या १७ वर्षीय हिंदी भाषिक मुलीच्या आईवडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तिचा सांभाळ करणाºया आजीचाही (आईची आई) अडीच महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. प्लास्टिकच्या मोत्यांच्या माळा बनवून ती आपला उदरनिर्वाह करत असताना तिची नाझियाशी ओळख झाली. तिने पैशांचे आमिष दाखवून या मुलीला शरीरविक्रयाच्या व्यवसायात लोटले. एका गिºहाइकाकडून दोन हजार रुपये स्वीकारून त्यातील केवळ ६०० रुपये देऊन पीडित मुलीची ती बोळवण करत होती. तिच्या असहायतेचा नाझियाने गैरफायदा घेतल्याचे तपासात उघड झाले. नाझिया विवाह जुळवण्याचेही काम करत होती.आमिष दाखवून जाळ्यात-सुनीताने वास्तव्याला असलेल्या परिसरातील अल्पवयीन मुलीला हेरले. तिचा प्रियकर राजेशमच्या मदतीने तिलाही पैशांच्या आमिषाने यात ओढले. या बदल्यात तिलाही ६०० रुपये मिळत होते. एखाद्या गिºहाइकाने या मुलींना नेल्यानंतर राजेशम हा त्यांच्यावर पाळतही ठेवत असे.
ठाणे : पैशांचे आमिष दाखवून अत्याचार, दोन अल्पवयीन मुलींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 2:14 AM