ठाणे : पोखरण रोड क्रमांक भागात असहाय्य मुलींना शरीरविक्रयास भाग पाडणाऱ्या दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी गुरुवारी दिली. तिच्या तावडीतून दोन पीडित महिलांचीही सुटका करण्यात आली.
ठाणे शहर परिसरात पीडित असहाय्य मुलींना फूस लावून त्यांना शरीरविक्रयास भाग पाडण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याचआधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार श्रद्धा कदम, डी. जे. भोसले, एस. व्ही. सोननीस, डी. व्ही. चव्हाण आणि पोलिस हवालदार पी. ए. दिवाळे आदींच्या पथकाने १० मे २०२३ रोजी कॅडबरी जंक्शनजवळील डी-मार्ट गेटच्या बाजूला पोखरण रोड क्रमांक एक भागात बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला.
त्यावेळी दलाल महिलेला ताब्यात घेऊन दोन पीडित महिलांची पथकाने सुटका केली. तिथून पसार झालेल्या साथीदारासह दलाल महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या रॅकेटमधील दलाल महिलेच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.