ठाणे : एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या निमित्ताने हातचलाखीने ठाण्यातील एका युवकाची १० हजारांनी फसवणूक करण्यात आली. चितळसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील मूळचे लालधर नवमीराम जैस्वार (३४) यांचे ठाण्यातील टिकुजिनीवाडी रोडवरील कृष्णानगरात वास्तव्य आहे. ते कोठारी कम्पाउंडमधील एका कंपनीमध्ये नोकरीला असून हिरानंदानी इस्टेटमधील स्टेट बँकेत त्यांचे बचत खाते आहे. प्रत्येक महिन्याचा पगार ते या खात्यामध्ये जमा करतात. शुक्रवारी दुपारी ते मानपाडा येथील सोहम प्लाझामधील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. या वेळी त्यांचा मित्र शीतल जैस्वारदेखील सोबत होता. जैस्वार यांना इंग्रजीचे ज्ञान कमी असल्याने त्यांना एटीएममधून पैसे काढणे जमले नाही. दोनतीन वेळा प्रयत्न करूनही पैसे काढणे जमत नसल्याचे पाहून तिथे उभा असलेला ३० ते ३५ वर्षांचा अनोळखी इसम मदतीसाठी समोर आला. जैस्वार यांनी त्यांना खात्यातून ६०० रुपये काढून देण्यास सांगितले. मात्र, खात्यात पुरेसे पैसे आहेत की नाही, हे बघण्यास सांगून जैस्वार यांच्या खात्यातील शिल्लक तपासली.आरोपीने जैस्वार यांना त्यांच्या खात्यातील ६०० रुपये काढून दिले. काम झाल्यानंतर जैस्वार एटीएमकार्ड घेऊन निघून गेले. साधारणत: तासाभराने जैस्वार यांच्या मोबाइल फोनवर त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. जैस्वार यांनी लगेच बँकेशी संपर्क साधला असता, बँकेने त्यांना एटीएमकार्ड घेऊन येण्यास सांगितले. बँकेने त्यांचे एटीएमकार्ड तपासले असता, ते वसंत खैरे नावाच्या व्यक्तीचे असल्याचे समजले. अनोळखी इसमाने जैस्वार यांना पैसे काढून देण्याच्या निमित्ताने दुसºयाचेच एटीएमकार्ड देऊन आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
ठाणे : हातचलाखीने एटीएमकार्ड घेऊन युवकास लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 2:12 AM