ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्य जीव प्राण्याच्या संशोधनाच्या कामासाठी जवळच्या येऊर जंगलात कॅमेरा ट्राप लावलेला होता. त्याची चोरी करणाऱ्या शिकाऱ्यांनेच येऊरच्या जंगलातील वनपक्षांची शिकार केल्याची कबुली दिल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले. याशिवाय त्याच्याकडून अधिकची सखोल माहिती वनविभागाकडून घेतली जात असल्याचे वनविभागाकडून नमुद करण्यात आले आहे.
येऊर परिसरातील वणीचापाडा येथील रहिवाशी असलेला आरोपी सुशांत भोवर , यांच्यासह अन्य तिघे बंदूक व कु-हाड घेऊन राखीव वनात शिकारीच्या उद्देशाने प्रवेश करीत असल्याचे छायाचित्र व व्हिडीओ चित्रिकरण चोरीला गेलेल्या कॅमेऱ्यांत २५ नोव्हेंबर रोजी टिपले होते. पण त्यानंतरही संबंधीत कॅमेरा तेथेच लावण्यात आला होता. तोच कॅमेरा २४ डिसेंबर रोजी चोरीस गेला. आधी टिपलेल्या छायाचित्राच्या सहाय्याने पोलिसांनी तपास सुरू केला असता भोवर यास वर्तकनगर पोलिस व वन विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या १२ जानेवारीला ताब्यात घेतले. या चौकशी दरम्यान आरोपी भोवर याने कॅमेरा चोरल्याची कबुली दिली. त्याच्या घरातून चोरीला गेलेला कॅमेरा ही हस्तगत करण्यात आला. यानंतर कॅमेरा चोरी प्रकरणी पोलिसांनी आरोपी भोवर यास अटक करून न्यायालयात हजर केले होते. यावेळी शिकारीच्या म्हणजे वनगुन्ह्याच्या तपासाकामी आरोपीस ताब्यात घेण्याची विनंती वनविभागाने न्यायालयाकडे केली. न्यायालयाने विनंती मान्य करीत वनविभागाकडे आरोपीचा ताबा दिला.त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी भोवर यांची १५ जानेवारी रोजी चौकशी सुरू केली. यादरम्यान त्याचेकडील बंदुकीने आरोपी भोवर याने वनपक्ष्यांची शिकार केल्याची कबुली दिली असून त्यांची पुन्हा सखोल तपासणी सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले. या तपास पथकामध्ये येऊर परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार, परिमंडळ वन अधिकारी सुजय कोळी,वनरक्षक येऊर पूर्व संजय साबळे, वनरक्षक येऊर पश्चिम राजन खरात, वनरक्षक पाचपाखाडी अमित राणे, शेखर मोरे, रमाकांत मोरे, अनिप आदी वन अधिकाऱ्यांचा समावेश आहे