मुंबई : नवोदित बुद्धिबळपटूंना नवी संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी २० आॅगस्टला आंतरशालेय सांघिक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने होत असलेली ही स्पर्धा मुलुंड येथील मराठा मंडळ सभागृह येथे पार पडेल. या स्पर्धेसाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या विभागातून स्पर्धकांनी आपला प्रवेश निश्चित केला असून या स्पर्धेत खेळाडूंना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली.एकूण ६ विविध गटामध्ये होणाºया या स्पर्धेत पहिली व दुसरी, इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी, इयत्ता पाचवी व सहावी, इयत्ता सातवी व आठवी आणि इयत्ता नववी व दहावी अशा लढती रंगतील. प्रत्येक शाळेच्या संघात ४ खेळाडूंचा समावेश मर्यादित ठेवण्यात आला असून हा संघ मुलांचा, मुलींचा किंवा मिश्रित असू शकतो. खेळाडूंची संख्या जास्त असल्यास शाळा कितीही संघ पाठवू शकतात, अशी माहितीही आयोजकांनी दिली.प्रत्येक गटविजेत्या संघाला सुशीला वझे स्मृती फिरता चषक देण्यात येणार असून पहिल्या तीन शाळांना विशेष चषकासह विजेत्या शाळेच्या खेळाडूंना वैयक्तिक पदक देऊन गौरविण्यात येईल.
ठाण्यात नवोदित खेळाडूंसाठी शालेय सांघिक बुद्धिबळ स्पर्धा रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 3:51 AM