भिवंडी - वायरिंग टेप घेण्यासाठी हार्डवेअरच्या दुकानात गेलेल्या २४ वर्षीय तरुणावर जुन्या वादाच्या रागातून चाकू हल्ला केल्याची खळबळ जनक घटना बुधवारी शहरातील मंडई परिसरात घडली आहे. या चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी तरुणाच्या भावाने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मोहतशीम फैज बोलींजकर वय २४ वर्ष रा. कोयला गल्ली, प्रभुअळी असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. महोतशीम हा मंडई परिसरातील एका हार्डवेअरच्या दुकानावर वायरिंगचा टेप घेण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी आरोपी असलम बोलींजकर याने त्यांच्यात झालेल्या पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मोहतशीम याच्यावर धारदार चाकूने गळ्यावर वार केले.यात मोहतशीम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी मोहतशीम याचा भाऊ मुंताजीम फैज बोलींजकर याने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात हल्लेखोर असलम बोलींजकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.शहर पोलिसांनी हल्लेखोर अस्लम यास तात्काळ अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी करीत आहेत.