ठाणे : बाईकिंगचे वेड असणाऱ्या ठाणे पूर्व येथील रोहन गोखले या तरुणाने २५,५२५ कि.मी.चा प्रवास करून भारतभ्रमण केले. १४० दिवसांत त्याने २८ राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेशांना भेटी दिल्या. इतकेच नव्हे तर या प्रवासात त्याने रस्ते सुरक्षाबरोबर कोरोनाचे नियम पाळण्याचा संदेश तेथील जनतेला दिला. ६ डिसेंबर रोजी सुरू केलेला हा प्रवास शनिवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी पूर्ण झाला. रोहनच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने हे भ्रमण करण्यासाठी चक्क नोकरीही सोडली.
दोन वर्षे आधीच रोहनने बाईकवरून भारतभ्रमण करण्याचा निश्चय मनाशी केला होता. नोकरी करून हे स्वप्न पूर्ण करणे शक्य नसल्याने त्याने १० वर्षांची नोकरी सोडली. ६ डिसेंबर रोजी ठाणे येथून त्याने आपल्या प्रवासास सुरुवात केली. गुजरात-राजस्थान-हरियाणा-हिमाचल-उत्तरप्रदेश-सिक्कीम-मध्यप्रदेश-झारखंड-छत्तीसगड-ओरिसा, तामिळनाडू-आंध्रप्रदेश-केरळ- अशा विविध भागांत त्याने बाईकवरून भ्रमण केले.
अंदमानला जाण्यासाठी जी प्रक्रिया करायची होती, त्यासाठी एक महिना लागणार होता आणि लक्षद्वीप येथे जाण्यासाठी क्रूझशिवाय पर्याय नव्हता, म्हणून अंदमानला विमानाने तर लक्षद्वीपला क्रूझने भेटी दिल्या. प्रत्येक राज्यातील राजधानीला तो भेटी देत होता. ज्या ज्या राज्यात रोहन गेला, त्या त्या ठिकाणी प्रत्येक भारतीयाने त्याचे चांगले स्वागत केले. कोणी स्वतःच्या घरात राहण्यास सांगितले. कधी तो गुरुद्वारा, कधी हॉटेलमध्ये, तर त्रिपुराला असताना तो मंदिरातही राहिला. हे सर्व भ्रमण त्याने स्वखर्चातून केले.
यात त्याला त्याच्या आईवडिलांनी साथ दिल्याचे त्याने सांगितले. प्रत्येक राज्याची जीवनशैली, त्यांची खाद्यसंस्कृती मी जाणून घ्यायचो. अरुणाचल प्रदेश येथे गेल्यावर तेथील आपतानी या जमातीतील आदिवासी बांधवांनी स्वतःच्या घरात राहण्याची सोय केली. अगदी त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याचा पाहुणचार केल्याचे रोहनने ‘लोकमत’ला सांगितले. रोहनने या भ्रमंतीसाठी निघताना मानसिक तयारी केली होती. निवांत वेळ मिळाला की तो व्यायामदेखील करीत असे.