ठाणे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत सर्व घरकुल योजनेत राज्यात अव्वल कामगिरी केल्या बद्दल ठाणे जिल्हा परिषदेला राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, अति मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने, प्रकल्प संचालक डॉ.रुपाली सातपुते आणि तालुक्याचे गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांनी स्वीकारला.
आवास दिनाचे औचित्य साधत आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत असणार्या शबरी, रमाई, आदिम आदी घरकुल योजना या शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहेत. ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून या योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. मागील तीन वर्षांमध्ये जिल्ह्याला ७ हजार २३८ घरं बांधण्याचे लक्षांक देण्यात आले होते. विविध अडचणीचा सामना करत आजतागायत ६ हजार ४९२ घर बांधण्यात आली. त्यामुळे ८९.०७ टक्के उद्दिष्ट साध्य झाले. त्याच बरोबर या योजनांतर्गत लाभार्थ्यांचे आधार कार्ड जोडणी, बँक खाती पडताळणी यांसह विविधकामात ठाणे जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली आहे.
तसेच, रमाई आवास योजनेचे देखिल याच कालावधीत दिलेल्या उद्दीष्टांपैकी ७८ टक्के काम पुर्ण करण्यात आली आहे. तसेच आदीवासी विकास विभागाच्या सर्व घरकुल योजनांची अंमलबजावणी ८७ .०७ टक्के करण्यात आली आहे.
तालुक्यांची कामगिरी दमदार ठाणे जिल्ह्यातील सर्व घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत पाच तालुक्यांपैकी तीन तालुके अव्वल ठरले आहे. यामध्ये अंबरनाथ तालुक्याने 92 टक्के, शहापुर तालुक्याने 91.05 टक्के तर, कल्याण तालुक्यात 92.02 टक्के घरकुलांचे काम पुर्ण केले आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यातील गटविकास अधिकार्यांचा देखिल गौरव करण्यात आला.
कोकण विभागात अघई ग्रामपंचायत प्रथम शहापूर तालुक्यातील अघई ग्रामपंचायतीने घरकुल बांधण्याचे लक्षांक साध्य करून कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला. यावेळी या गावाचे ग्रामसेवक, सरपंचाना सन्मानित करण्यात आले.
घराचा पहिला हप्ता वितरित यंदाच्या वर्षी सन २०१९ -२० साठी देण्यात आलेल्या १७४४ उद्दिष्टपैकी १५५७ घरकुलाना मंजुरी देण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना घरांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला.