ठाणे : जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची निवड २६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वा. केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे ५३ सदस्य व पंचायत समितींचे पाच सभापतींची विशेष सभा जिल्हा नियोजन भवनमधील समिती सभागृहात आयोजित केली आहे. शिवसेनेसाठी हे अध्यक्ष सोडलेले असल्यामुळे या पक्षाच्या एसटी महिला प्रवर्गातील सदस्येची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे. या जि.प. अध्यक्षांच्या या निवडणुकीसाठी ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे ‘पीठासीन अधिकारी’ म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रस आणि भाजपाची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. सेनेच्या मंजुषा जाधव यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ही जागा रिक्त आहे. या रिक्त अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र देणे व स्विकारले जाणार आहे. यानंतर दुपारी ३ वा. नामनिर्देशनपत्रांची छाननी. या छाननीनंतर १५ मिनिटे उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास मतदान घेण्यात येणार असल्याचेजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमातीच्या (एसटी) महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमधून एसटी महिलेला उमेदवारी दिली जाणार आहे. यासाठी भिवडी तालुक्यातील वाफे येथील दिपाली पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अध्यक्ष पदी पाटील यांची बिनविरोध निवड करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे.
आगामी विधान सभेची निवडणूक लक्षात घेऊन सर्वाधिक सदस्य असलेल्या शिवसेनेने या जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पदासह सभापती पद आधीच दिलेले आहे. याशिवाय भाजपाला काही काळ सत्तेबाहेर ठेवून आता एक सभापती पद दऊन सत्तेत सहभागी करून घेतले. जिल्हा परिषदेत आता विरोधी पक्ष उरलेला नाही. यामुळे सेनेच्या पाटील यांच्या विरोधात कोणी उमेदवारी दाखल करण्याचा धोका पत्करणार नसल्याचे ऐकायला मिळत आहे.