लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दिमाखदार, देखण्या, ऐटीत चालणाऱ्या १०० ते १५० वर्षे जुन्या असलेल्या विंटेज कारचा रुबाब आणि नियमांचे पालन करीत भन्नाट वेगाने जाणाऱ्या सुपर बाईकचा थरार ठाणेकरांनी रविवारी सकाळी अनुभवला. वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी आयोजिलेल्या या रॅलीला पाहण्यासाठी ठाणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
या रॅलीला जयमल्हार फेम अभिनेते देवदत्त नागे, ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पाेलिस आयुक्त डॉ. महेश पाटील, पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्ता शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखविला. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे, सुप्रसिद्ध ब्लॉगर निखील मुंबईकर आणि हॅप्पी सिंग यांच्यासह अनेक नामांकित रायडर्सनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला हाेता.
या रॅलीत पाच विंटेज मोटारकारसह ५५० अश्वशक्ती पेक्षा अधिक क्षमतेच्या ६५ सुपर बाईकस्वारांनी सहभाग घेतला. रविवारी सकाळी ८.१० वाजता मासुंदा तलाव येथील चिंतामणी चौकातून रॅलीला सुरुवात झाल्यानंतर गजानन महाराज चौक , राममारुती रोड मार्गे तीन हात नाका त्यानंतर हिरानंदानी इस्टेट आणि पुन्हा टेंभी नाका ते टॉवरनाका येथे सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास रॅलीची सांगता झाली......................नियम पाळण्याची वृत्ती वाढावी- डॉ. महेश पाटीलवाहतूकीचे नियम न पाळल्याने अनेक वेळा रस्ते अपघातात अनेकांचा मृत्यू होतो. काही वेळा चालक जायबंदी होतात. असे अपघात टाळण्यासाठी वाहतूकीचे नियम पाळण्याची वृत्ती वाढविणे आवश्यक आहे. अशा बाईक रॅलीतूनही जनजागृती चांगल्या प्रकारे करता येते. नियमांचे पालन करणाऱ्या सुपरबाईकर्सचेही सर्वांनी अनुकरण करुन नियमांचे पालन करावे, असा सल्ला यावेळी डॉ. महेश पाटील यांनी यावेळी दिला.या बाईकर्सचा झाला सत्कार-मुंबई- लंडन-मुंबई असा एकूण २९ हजार किलोमटरचा प्रवास दुचाकीवरून यशस्वीपणे पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरलेल्या योगेश अलेकरी यांच्यासह गणेश म्हमाणे, कुमार पिसाळ आणि प्रसाद चौलकर यांचाही यावेळी विशेष सत्कार झाला. अलेकरी यांनी रस्ता सुरक्षेबराेबरच २७ देशांमधून १३६ दिवसांच्या विक्रमी भ्रमंती दरम्यान वसुधैव कुटुंबकम या भारतीय विचाराचा प्रचार आणि प्रसार केला. दिव्यांग म्हमाणे यांनी भारत नेपाळ भूतान या तीन देशात दुचाकीवरून प्रवास करुन १२ दिवसांत सहा हजार किमीचा सुरक्षीत प्रवास केला. इतर दिव्यांग बांधवांना त्यांचा हा प्रवास निश्चितपणे प्रेरणादायी आहे.