लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना लसींच्या साठ्यावर राजकीय नेते डल्ला मारत असल्याने तसेच खासगी रुग्णालयांना ७८० रुपयांना विकण्याकरिता लस उपलब्ध होत असल्याने ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला घरघर लागली आहे. मागील आठवड्यात जेमतेम तीन दिवस महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण झाले. मात्र त्याचवेळी राजकीय नेत्यांच्या आग्रहाखातर सुरू झालेल्या काही लसीकरण केंद्रांवर व खासगी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध होती.
राजकीय नेते लसीकरणाच्या मोहिमेचे श्रेय उकळत असल्यानेच, लसीकरण मोहिमेला राजकीय रंग देऊ नका, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. महापालिकेचे लसीकरण बंद असले तरी, काही खासगी रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे. त्यामुळे ज्या ठाणेकरांना ७८० रुपये खर्च करून लस घेणे शक्य आहे, ते घेत आहेत. राज्य शासनाकडून पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण बंद असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
मागील काही दिवस सुरळीत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला पुन्हा एकदा खो बसला. ठाण्यात ५६ केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरू होती. १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण बंद होते, तेव्हा उपलब्ध होणारी लस पुरेशी असल्याने लसीकरण सुरळीत सुरू होते. दोन लसींमध्ये ८४ दिवसांचे अंतर असल्याने देखील लसीकरण मोहीम सुरळीत होती. पालिकेने खासगी रुग्णालये तसेच संस्थांना लसीकरणाची परवानगी दिल्यानंतर तसेच १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पुन्हा सुरू केल्याने लसींचा तुटवडा निर्माण झाला. पालिकेला रोजच्या रोज २ ते १२ हजारापर्यंत लस उपलब्ध होत असल्याने केवळ एक किंवा दोन दिवसांपुरते नियोजन होत आहे. राजकीय मंडळींनी महापालिकेच्या लसीकरणावर कब्जा करून स्वत:चे मार्केटिंग सुरू केल्याने या मोहिमेला राजकीय रंग प्राप्त झाला. तसा रंग येऊ नये, असे आवाहन आता महापालिकेने केले.
............
लसीकरण केंद्रावरील कर्मचारी आरोग्य केंद्रावर
प्रत्येक लसीकरण केंद्रावर साधारणपणे सहा कर्मचारी असतात. शहरातील ५६ केंद्रांवर मनुष्यबळाचे नियोजन करावे लागते. आता लसीकरण बंद असल्याने येथील कर्मचारी आरोग्य केंद्रावर पाठवले जातात. मोबाइल व्हॅक्सिनेशन व्हॅन किंवा आपले रुग्णालयातील कर्मचारी आरोग्य केंद्रात पाठविले जात आहेत. लसीकरण सुरू झाल्यानंतर हे मनुष्यबळ उपलब्ध केले जाते.
............
खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू
ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील लसीकरण मोहीम थांबली असली तरी, शहरातील काही खासगी रुग्णालयांत मात्र लसीकरण मोहीम सुरू आहे. या ठिकाणी ७८० रुपये देऊन लस घेता येते. कदाचित भविष्यात नागरिकांनी खिशात हात घालून लस घ्यावी, यासाठीच लसीचा तुटवडा निर्माण केला जात असल्याचा सवाल केला जात आहे.
..............
आता सर्वच वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी होत होती. त्यामुळेच लसीचा तुटवडा निर्माण झाला. राज्य शासनाकडून जशी लस उपलब्ध होईल, त्यानुसार लसीकरण केले जात आहे.
- डॉ. वैजयंती देवगीकर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा
...........