लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे परिवहनसेवेमार्फत ठाणेकरांना सुखकर प्रवास मिळणे यंदाही कठीणच आहे. शहराच्या अंतर्गत भागात आणखी ५० नव्या मिडीबस घेण्याचा परिवहनचा विचार आहे. मात्र, याव्यतिरिक्त ठाणेकर प्रवाशांसाठी इतर कोणत्याच नवीन सुविधा किंवा प्रवास सुखकर करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना परिवहनच्या अंदाजपत्रकात नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले. याउलट, दरवाढीच्या माध्यमातून ठाणेकरांच्या खिशाला भुर्दंड लावण्याचा प्रयत्न नव्या आर्थिक वर्षात केला जाणार आहे.
मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात बसभाड्यापोटी १६३ कोटी ७४ लाख रु पयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. यातून प्रत्येक दिवशी तीन लाख ४० हजार रु पये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. त्यानुसार, नऊ कोटी २५ लाख अधिकचे उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मागील वर्षीच परिवहन प्रशासनाने २० टक्के तिकीटदरवाढीचे संकेत अंदाजपत्रकात दिले होते. मात्र, परिवहन समितीने हा प्रस्ताव फेटाळून लावला. आता वर्षभरानंतर परिवहनने महासभेत २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव आणला आहे.
आजघडीला परिवहनच्या ताफ्यात ३५० च्या आसपास बस आहेत. तरीही, या बस कमी पडत आहेत. शहराच्या अंतर्गत भागात येजा करण्यासाठी छोट्या मिडीबस असाव्यात, असे परिवहनचे मत आहे. त्यानुसार, सोमवारी सादर होणाऱ्या परिवहनच्या अर्थसंकल्पात ५० मिडीबस घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या बस लांब पल्ल्यांच्या मार्गावर धावणार नसून केवळ शहरातील अंतर्गत भागात म्हणजे स्टेशन ते पाचपाखाडी, नितीन कंपनी, जांभळीनाका, कोर्टनाका आदींसह शहराच्या इतर भागात रिंगरूट पद्धतीने धावणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
खास महिलांसाठी असलेल्या उर्वरित तेजस्विनी बसेस ताफ्यात सामावून घेतानाच परिवहनच्या नादुरुस्त असलेल्या १५० बस दुरुस्त करून जीसीसी तत्त्वावर पुन्हा खाजगी संस्थेला देण्याचा परिवहनचा विचार आहे. त्याचाही विचार या अंदाजपत्रकात करण्यात आल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत पालिकेकडून जास्त अनुदान मिळण्याची अपेक्षा परिवहनने व्यक्त केली आहे.बस आजघडीला परिवहनच्या ताफ्यात आहेत. तरीही, या बस कमी पडत आहेत. शहराच्या अंतर्गत भागात येजा करण्यासाठी छोट्या मिडीबस असाव्यात, असे परिवहनचे मत आहे.