प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिकेच्या सहकार्याने व शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने शहरात 'उत्सव ७५ ठाणे' साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त ठाणे शहराचा इतिहास येथील स्थानिक नागरिक, तरुणाई ला समजावा या करीता '' हेरिटेज वॉक'' ( ठाण्यातील वारसा स्थळांना भेट ) चे आयोजन शनिवारी सकाळी करण्यात आले होते. या हेरिटेज वॉकला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या वास्तू पासून या हेरिटेज वॉक ला सुरुवात झाली. इतिहासअभ्यासक अंकुर काणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा हेरिटेज वॉक आयोजित केला होता . यावेळी काणे यांनी उपस्थित लोकांना शहराचा भौगोलिक माहिती देऊन ऐतिहासिक संदर्भ ची माहिती दिली .
हेरिटेज वॉक मध्ये माझे ग्रंथ भांडार जवळील पेशवेकालीन विहीर दाखवण्यात आली . त्यानंतर राघोबा शंकर रोड मार्ग हा वॉक चेंदणी कोळीवाडा येथील दत्त मंदिर ला भेट दिली . या ठिकाणी अंकुर काणे यांनी मंदिराचे वास्तुस्थापत्य याची माहिती दिली. सर्वात जुने असलेल्या मामलेदार कार्यालयासही यावेळी भेट देण्यात आली. तिथे पूर्वी असलेल्या हिराकोट ची माहिती अंकुर काणे यांनी दिली. त्यानंतर हा वॉक श्री कौपिनेश्वर मंदिर आवारात गेला. या ठिकाणी मंदिराची ऐतिहासिक माहिती देण्यात आली.
तद्नंतर बाजारपेठ मार्गे तलावपाळी परिसरात वॉक गेल्यावर काणे यांनी मासुंदा तलाव , सेंट जॉर्ज चर्च यांची माहिती दिली . त्यानंतर टेभी नाका मार्गे टाऊन हॉल येथे पोहचल्यावर या हेरिटेज वॉक ची सांगता झाली.यावेळी श्रीपाद भालेराव, ऍड . स्वाती दीक्षित, संजीव ब्रम्हे, ऍड. योगिता कामथे यांच्यासह अन्य उपस्थित होते. टाऊन हॉल येथे इतिहासतज्ज्ञ सदाशिव टेटविलकर यांनी हेरिटेज वॉक मध्ये सहभागी झालेल्या ठाणेकरांना जुन्या ठाण्याबद्दल माहिती दिली. अशापध्दतीचा हेरिटेज वॉक आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी महापालिकेचे व उत्सवसमितीचे आभार मानले.