लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे - कोलकाता येेथे झालेल्या पाचव्या राष्ट्रीय काव्य संमेलनात बहुभाषिक कवी सहभागी झाले होते. मराठी कवी म्हणून ठाणेकर संकेत म्हात्रे यांना निमंत्रित केले होते. या संमेलनात संकेत यांनी मराठी कविता सादर करत कोलकातावासीयांची उत्तम दाद मिळविली.
कोलकाता येथील न्यू टाऊनमध्ये २८ फेब्रुवारीपासून ते ३ मार्चपर्यंत संमेलन आयोजित केले होते. सहभागी होणाऱ्या कवींना आपल्या भाषेत कविता सादर करायच्या होत्या. त्यामुळे या काव्य संमेलनात कोलकाता, महाराष्ट्र यासह पाँडिचेरी, आसाम, पंजाब, केरळ आदी प्रांतांतील महत्त्वाचे कवी सहभागी होते. या संपूर्ण सोहळ्यात बंगाली काव्यमैफल, संस्कृत भाषेवर परिसंवाद आणि पुस्तक प्रकाशन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. या बहुभाषिक कविसंमेलनात संकेत म्हात्रे ह्यांच्यासोबत महत्त्वाचे कवी आनिक चटर्जी, गोपाल लाहिरी, अमानिता सेन, इप्सिता गांगुली, शेखर बॅनर्जी, सर्बाजीत सरकार, कवी डॉ. रांजीब दत्ता, कवयित्री अफरुजा अख्तर, रोनाल्डो टाईड आणि अन्य कवी तसेच मुंबईतून कवयित्री उर्णा बोस आणि डॉ. पारमिता मुखर्जी मलिक याही उपस्थित होत्या. संकेत यांनी संमेलनात ‘अस्वस्थ’ आणि ‘रांडबाजारी पुरुष’ या दोन कविता सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली.
‘मराठीसारखंच बंगाली भाषेतलं साहित्य प्रचंड समृद्ध आहे. अगदी भाषिक समानताही बघायला मिळतेच. त्यामुळे मराठी भाषेला इथे स्थान मिळणं नैसर्गिक होतं. इथल्या दर्जेदार कवितांमध्ये मराठीला इतक्या मानाचं स्थान द्यावं आणि इथल्या स्थानिकांपर्यंत ही भाषा पोहोचवावी हे फार विलक्षण आहे’, असे संकेत यांनी सांगितलं. यावेळी ‘कोलकाता कॉकटेल’ या काव्यपटाचेदेखील सादरीकरण पार पडले.