लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : 'ओंकार स्वरुपा' या गणेशवंदनेचे सूर कोरम मॉलमध्ये घुमले आणि 'नक्षत्रांच्या गाण्या'च्या मैफलीतील गझल, प्रेमगीते, लावणी, कोळीगीते या गाण्यांनी अक्षरशः धम्माल उडवून दिली. मॉलमध्ये खरेदीकरिता आलेले गाणी ऐकत थबकलेच नाहीत तर कोळीगीतांवर ते चक्क थिरकलेही.
लोकमत माध्यम समूहाच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त लोकमत साहित्य पुरस्काराचे वितरण मंगळवारी करण्यात येणार आहे. त्याआधी मराठी भाषेचा जागर करण्याकरिता लोकमत साहित्य महोत्सवाचे आयोजन कोरम मॉलमध्ये करण्यात आले होते. तीन दिवसीय साहित्य महोत्सवाची सुरुवात २४ तारखेला ग्रंथप्रदर्शनाने झाली. महोत्सवाचे पहिले पुष्प शनिवारी 'कवी कट्टा'ने गुंफले, तर दुसरे पुष्प रविवारी 'वर्दीतील दर्दी' या कार्यक्रमातून गुंफले गेले.
सोमवारी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी 'नक्षत्रांची गाणी' हा कार्यक्रम या महोत्सवाचा कळसाध्याय ठरला. प्रभो शिवाजी राजा, साधी भोळी मीरा तुला, हे चिंचेचे झाड मज दिसे चिनार वृक्षापरी, प्रीतीच्या चांदराती, वारा गाई गाणे, वेसावची पारू, चंद्रा, लखलख चंदेरी तेजाची, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर, रूपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना व अशा असंख्य गीतांच्या सुरावटीत रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बोर्डे यांनी केले.लोकगायक संदेश उमप हे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. त्यांनी ख्यातनाम लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या जांभूळ आख्यानाची आठवून करून देत गाजलेले भारूड 'फू बाई फू'च्या पंक्ती गायल्या.
कोळीगीतांनी उडवून दिली धम्मालचंदशेखर शिंदे यानी मी हाय कोली' हे कोळीगीत सादर केले. त्यावर दत्तात्रय पांगे आणि रेखा निभवणे यांनी कोळी वेशभूषा करून नृत्य सादर केले. त्याला उपस्थित रसिकांनी चांगलीच दाद दिली. सहकलाकार व मॉलमध्ये खरेदीकरिता आलेले स्टेजच्या समोर येऊन नाचत होते. शिंदे यांच्या गाण्याला यन्स मोअर मिळाला, त्यांनी पुन्हा 'येसायची पारू या गीतावर नृत्य सादर केले.कमलेश माईनकर यांनी 'हिरवा निसर्ग', महेंक शेख हिने 'वेसावची पारू' हे कोळीगीत आणि चंद्रा ही लावणी उत्तम गायली, त्यामुळे कार्यक्रमात रंगत भरली.
शिल्पा तोरस्कर यांनी 'माळ्याच्या मळ्या मंदी' हे गाणे गाऊन कृष्णधवल चित्रपटाच्या काळात रसिकांना नेऊन ठेवले.शिल्पा चवरकर यांनी सुन्या सुन्या मैफलीत माझ्या' • ही गझल लीलया गायली. सावनकुमार सुपे यानी मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा' हे मैत्रीची महती जपणारे गीत गायले.
अंध मुलींचे गायन ठरले लक्षवेधीश्रेया शिपी या अंध मुलीने 'राजा सारंगा' हे गीत सादर केले, तर ऋजूल गोयथळे या अंध मुलीने 'येऊ कशी प्रिया हे गीत सादर करून सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. तिच्या गाण्यालाही वन्स मोअर मिळाला.