ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर हे सलग दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ठाण्यात हवा कुणाची, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. मात्र, केलेली विकासकामे आणि भविष्यात होणाºया कामांच्या जोरावरच आपण मतदारांकडे मते मागत असल्याचे ते सांगतात.
सकाळी ६ वाजता मॉर्निंग वॉकने त्यांच्या प्रचाराला सुरुवात होते. पुढे १० वाजता प्रचार कार्यालय गाठल्यानंतर नियोजन, कार्यकर्त्यांना सूूचना, विविध संस्थांच्या भेटीगाठी आणि सायंकाळी ५ वाजता प्रचाररॅलीला सुरुवात होते. तिचे कुठे फटाक्यांची आतषबाजी, तर कुठे औक्षण, तर कुठे बाइकरॅलीने स्वागत होत आहे. रॅलीत भाजप, शिवसेनेसह मित्रपक्षांची टीम कामाला लागल्याचे दिसत आहे.विशेष म्हणजे यंदा ‘आमचं पुन्हा ठरलंय’ म्हणत मतदार आमचं मत विकासालाच, असे सांगून म्हणजेच केळकरांचा हुरूप वाढविताना दिसतात. केळकर यांचे वय ६२ असून ते आजही शरीराने तंदुरुस्त आहेत. दिवसभर भेटीगाठी, चर्चा, रॅली, रात्री २ ते ३ वाजेपर्यंत चालणाºया मीटिंग आदींनंतरही त्यांच्या चेहºयावर जराही थकवा दिसत नाही. गुरुवारी सकाळी ६ वाजता ते मॉर्निंग वॉकला निघाले.
मॉर्निंग वॉकला येणाºया मतदारांच्या भेटीगाठी घेऊन सूर्यनमस्कार, योगा आदी करून सकाळी ९ वाजता घर गाठले. त्यानंतर अंघोळ, हलकाफुलका नाश्ता करून हातात दोन चपात्या, भाज्या असलेला जेवणाचा डबा सोबत घेऊन सकाळी १० वाजता त्यांनी कार्यालय गाठले. विशेष म्हणजे एखाद्याला वेळ दिला असेल, तर त्या वेळेतच ते त्याला भेटतात. त्यामुळे भेटण्यासाठी आलेला प्रत्येक कार्यकर्ता, नागरिक यांचे समाधान होते. कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन काही सूचनाही ते करताना दिसत होते. आजच्या प्रचाराची कशी तयारी आहे, कोणावर काय जबाबदारी दिली आहे, रॅली, चौकसभा, विविध संस्थांच्या भेटीगाठीच्या वेळा आदींची माहिती घेऊन पुढील कामास ते सज्ज असल्याचे दिसतात. त्यानंतर, दुपारी १ च्या सुमारास त्यांनी शिवदर्शन सोसायटी, पुढे कॉसमॉस लॉन्झ, हिरानंदानी इस्टेट, एव्हरेस्ट वर्ल्ड, आझादनगर आदी सोसायटीधारकांच्या भेटी घेतल्या. या भेटीमध्येही येथील रहिवाशांनी पाण्याच्या समस्या, वाहतूककोंडी आदींसह इतर समस्यांचा पाढा त्यांच्यापुढे मांडला. मात्र, त्या कशा सोडवायच्या, त्यासाठी काय करता येईल आदींवर शांतपणे केळकर यांनी उत्तरे दिली. विशेष म्हणजे ज्याज्या भागात ते जात होते, त्यात्या भागातील प्रत्येक ५० पदाधिकाºयांवर जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने ते आधीच सज्ज असल्याचे दिसून आले.
सायंकाळी ४ च्या सुमारास प्रभाग क्रमांक २ मध्ये डोंगरीपाडा, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट आदी भागात रॅली काढण्यात आली. यावेळी अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे केळकर यांचे औक्षण केले. अनेकांनी यंदा आमचं ठरलंय, पुन्हा केळकरच, असे म्हणून त्यांच्याप्रति विश्वास व्यक्त केला. त्यानंतर, बाळकुम येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेच्या ठिकाणी ते पोहोचले. याठिकाणी त्यांच्या प्रचारासाठी गणेश नाईक, संजीव नाईक, किरीट सोमय्या, महापौर मीनाक्षी शिंदे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.आरोग्याकडेही लक्षरात्री १० वाजण्याच्या सुमारास संजय केळकर यांनी पुन्हा कार्यालय गाठले. त्यानंतर, पुन्हा दुसºया नियोजनावर चर्चा केली. प्रत्येकाच्या बाजू ऐकून घेतल्या. मतदारांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल, याचीही माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर, मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घर गाठले. यानंतर, केवळ भिजत घातलेले कडधान्य सेवन करुन त्यांनी झोप घेतली. एकूणच सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत प्रचाराची धुरा सांभाळताना त्यांनी आपल्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष दिल्याचे दिसले.