ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या कामामुळे अवजड वाहनांचा भार शहरात आल्याने वाहतूककोंडीचा फटका ठाणेकरांना वारंवार सहन करावा लागत आहे. अशातच मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलावर बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले गेल्याने शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास साकेत पूल ते कापूरबावडी आणि कॅडबरी जंक्शनपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांना पाच मिनिटांच्या अंतरासाठी सुमारे पाऊण तास लागल्याचे चित्र दिसत होते.
मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला पाऊस पडल्यामुळे शनिवारीही पूर्ण करता आले नाही. कामाच्या रखडपट्टीमुळे या मार्गावरील वाहतूक बदल सोमवारपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस ठाणेकरांना वाहतूककोंडीत अडकावे लागण्याची शक्यता आहे. उरण-जेएनपीटीहून सुटणारी हजारो अवजड वाहने मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून ठाण्याच्या दिशेने येत असतात. २८ जुलैला येथील ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर खड्डा पडल्याने तो बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे येथील अवजड वाहतूक महापे, कोपरखैरणे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, कोपरी पूल मार्गे वळविण्यात आली आहेत. याचा परिणाम कोपरी, तीनहातनाका भागात होऊन वाहतूककोंडी होत आहे. काही ट्रक आणि टेम्पोचालक हे टोल टाळण्यासाठी पटणी, कळवा, विटावा मार्गे ठाणे शहरात येत असल्याने कळवा-विटावा भागातही वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे या मार्गावरही चालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. शनिवारपर्यंत येथील वाहतूक बदल कायम ठेवण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला होता. मात्र, शनिवारीही सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करणे शक्य झाले नसल्याने आता १६ ऑगस्टपर्यंत वाहतूक बदल पोलिसांनी कायम ठेवले आहेत. शुक्रवारी रात्री काम पूर्ण होणार होते. मात्र, पाऊस पडल्याने कामात व्यत्यय आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. परंतु, त्याचा त्रास वाहनचालकांना नाहक सहन करावा लागत आहे.