नारायण जाधवठाणे : शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेल्या ठाणे रिंग रूट प्रकल्पासह नाशिकची निओ मेट्रो आणि नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गुरुवारी (दि. १०) लोकसभेत दिल्याने ठाणेकरांच्या आशा उंचावल्या आहेत. या प्रकल्पांना लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रशासित प्रदेशांसह राज्याचे १६ मेट्रो प्रस्ताव अंमलबजावणी आणि मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे आले असल्याची माहिती त्यांनी दिली. यातील महाराष्ट्रातील उपरोक्त तीन प्रस्तावांचा समावेश आहे. यात नाशिकची निओ मेट्रो ३३ कि.मी.ची असून, तिचा पूर्णत्वाचा कालावधी मंजुरी मिळाल्यापासून चार वर्षांचा आहे, तर नागपूर मेट्रो-२ ही ४३.८० कि.मी. आणि ठाणे महापालिकेची अंतर्गत रिंग रूट मेट्रोही २९ कि.मी.ची आहे. या दोन्हींचा पूर्णत्वाचा कालावधी मंजुरी मिळाल्यापासून पाच वर्षांचा असल्याचे पुरी यांनी यावेळी स्पष्ट केले. याशिवाय दिल्ली, केरळ, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान येथील मेट्रो प्रकल्पांचा समावेश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून एकही मेट्रो प्रकल्प आलेला नसल्याचे त्यांनी उत्तरात म्हटले आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्प २०१७ नुसार एखाद्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील शहरांमधील किंवा शहरी भागातील प्रकल्पाची व्यवहार्यता उपलब्धता या आधारावर राज्यांच्या मागणीवरून अशा प्रकल्पांना केंद्राकडून आर्थिक मदत मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
सहा हजार कोटींची होणार बचत
ठाणे महापालिकेने यापूर्वी प्रस्तावित केलेल्या मेट्रोसाठी सुमारे १३ हजार कोटी ९५ लाखांचा खर्च अपेक्षित धरला होता. मात्र, तो व्यवहार्य नसल्याचे सांगून केंद्राने हा प्रस्ताव फेटाळून एलआरटी अर्थात रिंगरूटचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते.रिंग रुटसाठी हाच खर्च सात हजार ९३० कोटींपर्यंतच असल्याने तब्बल पाच हजार ९३० कोटींची बचत होणार आहे.
ही आहेत स्थानकेनवीन ठाणे स्थानक - रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्यनगर बस आगार, शिवाईनगर, नीळकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटर फ्रंट, पातलीपाडा, आझादनगर बसथांबा,मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकूमनाका, बाळकूमपाडा ,राबोडी , शिवाजी चौक ,ठाणे जंक्शन अशी २२ स्थानके आहेत. यांपैकी नवीन ठाणे स्थानक आणि ठाणे जंक्शन ही दोन स्थानके भूमिगत असून, उर्वरित २० स्थानके उन्नत आहेत.