- जितेंद्र कालेकरठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील व्हीआयपी बंदोबस्त, गुन्ह्यांचा निपटारा करताना ठाणे शहर पोलिसांची दमछाक होत असल्याने ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील ३५ पोलिस ठाण्यांसाठी ५० टक्के वाढीव म्हणजे पाच हजार ४९७ इतक्या अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी पोलिस महासंचालकांकडे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सहा नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव दिला आहे. हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ठाणे पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.
पूर्वीच्या ठाणे ग्रामीणमधून ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाची १९८१ मध्ये निर्मिती झाली. त्यावेळी जेमतेम चार ते पाच हजारांचे संख्याबळ आयुक्तालयाच्या पोलिसांचे होते. त्यावेळी आयुक्तपदही विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे होते. ठाणे आयुक्तालयाने सुमारे साडेपाच हजार इतक्या अतिरिक्त मनुष्यबळाचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयात ऑगस्ट २०२३ मध्ये पाठविला आहे. यातील दोन हजार १४१ कर्मचारी हे ३५ पोलिस ठाण्यांसाठी दिले जातील.
अशी आहे ठाण्यातील सध्याची स्थितीआता आयुक्तपद पोलिस महासंचालक दर्जाचे झाले. त्याशिवाय, सहआयुक्तांसह चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, ११ उपायुक्त, ३० सहायक आयुक्त, १८२ निरीक्षक आणि २३९ सहायक पोलिस निरीक्षक असे ९२५ अधिकारी तसेच सुमारे नऊ हजार कर्मचारी असे दहा हजार ६६ पोलिसांचे संख्याबळ आयुक्तालयात तूर्त आहे. हे सर्व ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलिस ठाण्यासह गुन्हे अन्वेषण, विशेष शाखा आणि वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. आता ही संख्या रोजचा बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था, गुन्ह्यांचा शोध आणि वाहतूक नियंत्रणासाठी अत्यंत तोकडी पडत आहे. वाहतूक विभागासाठी तर ८०० कर्मचाऱ्यांची गरज आहे.
पोलिस ठाण्यांची संख्या ४१ होणार
वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि गुन्हेगारी त्याचबरोबर भौगोलिक परिस्थिती गुन्हेगारी नियंत्रण, कायदा सुव्यवस्था तसेच रस्ते अपघात अशा सर्वच अनुषंगाने विचार केल्यास ठाणे आयुक्तालयात आणखी सहा पोलिस ठाण्यांची गरज आहे. संवेदनशील मुंब्रा पोलिस ठाण्याचे विभाजन करुन नवीन दिवा, भिवंडीतील नारपोलीमधून दापोडे, शांतीनगरचे विभाजन करुन वंजारपट्टी तसेच शांतीनगर आणि नारपोली या दोन पोलिस ठाण्यांमधून मानसरोवर तर कल्याणच्या मानपाडा पोलिस ठाण्याच्या विभाजनातून काटई आणि उल्हासनगरच्या हिललाईनमधून नेवाळी या सहा पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. या सहा पोलिस ठाण्यांसाठी ६६४ इतक्या वाढीव कर्मचाऱ्यांचीही गरज लागणार आहे. या पोलिस ठाण्यांच्या जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही प्रस्ताव दिला आहे. शासन मंजुरी मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यांची संख्याही ३५ वरून ४१ होणार आहे.