ठाणे : वडाळा ते कासारवडवलीदरम्यान सुरू असलेल्या मेट्रो-४ च्या कामांमुळे ठाण्यात मोठ्या वाहतूककोंडीसह प्रदूषणाचा त्रास वाढल्याने ठाण्यातून मेट्रो-४ ही भूमिगत करण्याची मागणी नागरिकांच्या सर्वेक्षणामधून पुढे आली आहे.७९ टक्के नागरिकांनी मेट्रो भूमिगत व्हावी, असे मत नोंदवले आहे. म्युस या संस्थेने ठाण्यात हा सर्व्हे केला आहे. एमएमआरडीएने मेट्रो-४ चे काम सुरू झाले असून ठाण्यातून तीनहातनाका ते कासारवडवलीपर्यंत ती धावणार आहे. तीनहातनाक्यापासून ते घोडबंदर पट्ट्यात तिचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी दोन्ही बाजूला बॅरिकेड्स टाकल्याने दररोज वाहतूककोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागत आहे. या कामामुळे प्रदूषणामध्येही मोठी वाढ झाली आहे.या सर्व पार्श्वभूमीवर मुख्य मेट्रोचा नक्की ठाण्याला किती फायदा होणार, याचे सर्वेक्षण गेल्या आठवड्यात म्युस या सामाजिक संस्थेने ठाण्यात केले. त्यात जवळपास एक हजार लोकांना मेट्रो प्रकल्पाबाबत विचारणा केली. या सर्व्हेमध्ये ९१ टक्के नागरिकांना मेट्रो प्रकल्प काय आहे, याची माहिती आहे, तर ७९ टक्के नागरिकांना ठाण्यातून ती भूमिगत व्हावी, असे वाटते. मेट्रो भूमिगत झाल्याने प्रदूषणासह वाहतूककोंडीदेखील कमी होणार असल्याचे या नागरिकांना वाटते. हा सर्व्हे करत असताना ३४.१ टक्के नागरिकांना मेट्रोच्या स्टेशनबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे समोर आले.विशेष म्हणजे ६८.४ टक्के लोकांना मेट्रोबाबत कधी सुनावणी घेतली, याची माहितीच नसल्याचे उघड झाले. यामुळे संधी मिळाली, तर ८२.४ टक्के नागरिकांनी अजूनही मेट्रो प्रकल्पाबाबत हरकती आणि सूचना देण्याची इच्छा व्यक्त केली.एलिव्हेटेड मेट्रोला विरोधमेट्रोसाठी ठाण्यातून ४०० पेक्षा अधिक झाडांची कत्तल होणार असून ८८.८ टक्के नागरिकांनी त्यास आपला विरोध दर्शविला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यापेक्षा नियोजनबद्ध आराखडा निर्माण करणे आवश्यक होते. ५२ टक्के नागरिकांनी ठाण्यातून एलिव्हेटेड मेट्रो करून काही उपयोग नसून आज जी वाहतूककोंडी होत आहे, ती होणारच असल्याचे सांगितले; तर ८५ टक्के नागरिकांना या प्रकल्पाची किंमतच माहीत नसल्याचे सर्व्हेमधून स्पष्ट झाले.स्वस्त बसमार्ग हवामेट्रोपेक्षा जर ठाण्यातून चांगल्या बसमार्गाची सुरुवात केली, तर ते अधिक सोयीचे होणार असल्याचे ५८.२ टक्के नागरिकांना वाटते. मेट्रोच्या भाड्यापेक्षा कमी भाडे असलेला बसमार्ग सुरू केल्यास ते सयुक्तिक ठरेल असे नागरिकांना वाटते.
ठाणेकरांना मेट्रो हवी भूमिगत; म्युस संस्थेचे सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 5:44 AM