ठाणे : माझे घर ठाणे शहर या घोषवाक्याखाली ठाणे महापालिकेने संपूर्ण शहरभर १ ते २३ आॅक्टोबर या तीन आठवड्यांच्या कालावधीत व्यापक स्वच्छता मोहीम राबविणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाणेकर नागरिकांनी एक दिवस स्वच्छ सुंदर ठाण्यासाठी रस्त्यावर उतरुन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. विशेष म्हणजे २३ आॅक्टोबरला घेण्यात येणाऱ्या माय सिटी क्लीन सिटी या मेगा इव्हेंटमध्ये तब्बल १ लाख नागरिक शहरभर ती राबविणार असल्याचेही उभयतांनी यावेळी स्पष्ट केले. या मोहीमेची सुरवात १ आॅक्टोबर म्हणजेच महापालिकेच्या वर्धापन दिनी केली असून तिच्या पहिल्या टप्यात १ ते ३ आणि १८ व १९ तारखेला शहरातील चौक, आयलँड, मुख्य रस्ते, उड्डाणपुलाखालील जागा, फुटपाथ आदी त्यानंतर ६ व ७ तारखेला शहरातील सर्व झोपडपट्या सामूदायिक व सार्वजनिक शौचालये १० व ११ तारखेला शहरातील डेब्रीज हटविणे, १३ आॅक्टोबरला सर्व भाजी मंडया, मच्छी मार्केट, मटण मार्केट, चिकन व मटण शॉप, १५ तारखेला सर्व तलाव, खाडी, घाट, १७ तारखेला सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ती राबविण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्यात ४ तारखेला रेल्वे स्टेशन, राज्य परिवहन मंडळ व टीएमटी बसस्थानके व आगार, रिक्षा थांबे, लॉरी स्टॅण्ड, ५ आॅक्टोबरला शहरातील गृहनिर्माण संकुले, ८ व ९ तारखेला शासकीय, निमशासकीय, महामंडळे, संरक्षण, पोलीस आदी कार्यालये, १२ तारखेला फॉरेस्ट, उद्याने, मैदाने, स्पोर्टस् क्लब, तबेले, गो शाला, १४ तारखेला हॉटेल, रेस्टॉरन्ट, खाणावळी, हॉल, मॉल, १६ तारखेला सर्व प्रकारचे कारखाने, २१ तारखेला सरकारी, निमसरकारी, खाजगी रुग्णालये व दवाखाने आणि २३ आॅक्टोबरला संपूर्ण शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन व स्थानिक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, मित्र मंडळ, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, स्थानिक नागरिक, क्रीडा मंडळ यांच्या सहभागाने साफसफाई करुन घेण्यात येईल व साफसफाई विषयक नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरीता सिनेसृष्टीमधील कलाकार, खेळाडू, राजकीय पक्षाचे नते यांचाही सहभाग घेणार असल्याचे महापौर आणि आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती संजय वाघुले, सभागृह नेत्या अनिता गौरी, विरोधी पक्षनेते संजय भोईर, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोईर, मनोहर डुंबरे, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोक रणखांब, सिनेअभिनेते मंगेश देसाई, अंगत म्हैसकर आणि परी तेलंग आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणेकर करणार स्वच्छ, सुंदर ठाणे
By admin | Published: October 04, 2016 2:24 AM