ठाणे : ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेला हक्काचे धरण मिळवून देण्याचे वचन शिवसेनेने दिले आहे. शाई, काळू आणि कुशिवली अशा तीन ठिकाणच्या धरणांचे प्रस्ताव यापूर्वीच ठाणेकरांसमोर वेगवेगळ्या टप्प्यात पालिकेने मांडले होते. त्यातील नेमके कोणते धरण ठाणेकरांना मिळेल, याबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि शिवसेनेच्या नेत्यांनाही अद्याप पुरेशी माहिती नाही. यापूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोबरे धरणाच्या आश्वासनाचा मुद्दा गाजला होता, तर आघाडीच्या सत्तेच्या काळात तत्कालीन मंत्री मधुकर पिचड यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महापालिकेला स्वत:चे धरण हवे, असा मुद्दा मांडल्याने तोही चर्चेचा विषय बनला होता. शाई आणि काळू धरणांना पूर्वीपासूनच स्थानिकांचा विरोध आहे. कुशिवली धरणाचा प्रस्ताव फक्त चर्चेत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणेकरांना हक्काचे धरण मिळवून देणार असल्याची घोषणा केल्यानंतर पुन्हा रखडलेल्या धरणाचा मुद्दा चर्चेत आला. महापालिकेने शाई धरणासाठी २००७पासून प्रयत्न सुरू केले. या धरणासाठी ४५० कोटींचा खर्च अपेक्षित होता. (प्रतिनिधी)
ठाणेकरांना पुन्हा आश्वासनाचे धरण!
By admin | Published: January 23, 2017 3:48 AM