लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुसऱ्या अनलॉकमध्ये ठाणे शहरातील उद्याने खुली झाली खरी, परंतु सततच्या पावसामुळे ठाणेकरांनी सध्या उद्यानांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. काही बालउद्याने दुरवस्थेच्या विळख्यात सापडली आहेत. शहरातील काही उद्याने नेहमी अशाच परिस्थितीत पाहायला मिळतात, अशी खंत ठाणेकरांनी व्यक्त केली.
लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ठाणे शहरात उद्याने उभारण्यात आली. परंतु उद्यानांच्या दुरवस्थेकडे कायम महापालिकेचे दुर्लक्ष राहिले आहे, असा आरोप ठाणेकरांकडून केला जातो. लॉकडाऊनच्या काळात उद्याने दीड वर्षे बंद ठेवली होती. अनलॉक २ जाहीर झाल्यानंतर शहरातील उद्यानांची वेळ सकाळी ६ ते १० आणि दुपारी ४ ते रात्री ८ अशी असल्याचे ठाणे महापालिकेने सांगितले. परंतु गेले अनेक दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने ठाणेकरांना उद्यानात जाणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे शहरातील उद्याने ही स्वच्छ, सुंदर, सुस्थितीत आणि गर्दुल्ल्यांपासून मुक्त असावी अशी माफक अपेक्षा ठाणेकरांकडून व्यक्त होत असते. तुटलेल्या लाद्या, मोडकळीस आलेली आसनव्यवस्था आणि खेळणी, उद्यानात ढीगभर पडलेला पालापाचोळा, पावसाळ्यात तर वाढलेले गवत, पाण्याचे डबके, चिखल आणि शेवाळ पाहायला मिळत आहे. काही उद्यानाच्या भिंती कोसळलेल्या आहेत, तर संरक्षक जाळीची अवस्था बिकट आहे. त्यामुळे लहान मुलांचे मनोरंजन होईल आणि काही तास निवांत ठाणेकरांना घालवता येतील अशी उद्याने असावीत, अशी मागणी ठाणेकरांची आहे.
----------------------------
मैदाने खुली, खेळाडूंना आनंद
ऑनलाइन प्रशिक्षण घेऊन कंटाळलेल्या खेळाडूंना मैदानावर आल्याने आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले. दीड वर्षांनी अधिकृतरीत्या मैदाने खुली ठेवण्याची परवानगी दिल्याने आता पुन्हा सरावास सुरुवात करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालक आता मुलांना मैदानावर पाठवायला तयार आहेत. मोठ्या प्रमाणात खेळाडूंकडून प्रतिसाद मिळत आहेत. आऊटडोअर खेळ हे ऑनलाइन किती दिवस शिकविणार हादेखील प्रश्न होता. मैदाने खुली झाल्याने हा प्रश्न अखेर सुटला, असे क्रिकेट प्रशिक्षक दर्शन भोईर यांनी सांगितले.