ठाणे : अतिवृष्टीमुळे पिसे येथील पम्पिंग स्टेशनमध्ये साचलेला गाळ साफ करण्यासाठी बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. हे काम गुरुवारी उशिरा संपल्याने तीन दिवस ठाणेकरांचे पाण्यावाचून अक्षरशः हाल झाले. प्यायला, स्वयंपाकालादेखील पाणी नाही आणि कोरोनामध्ये बाहेर जेवायला जायचे तरी कसे, अशी बिकट अवस्था ठाणेकरांची झाली होती. शनिवारी पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने ठाणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झालेला होता. तो पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झालेला होता. त्यामुळे ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून कमी होत होता. वाहत आलेला गाळ काढण्यासाठी बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शटडाऊन घोषित केले होते. गाळ काढण्याचे काम हे गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत संपणार होते. मात्र, ते संध्याकाळी उशिरापर्यंत चालले. या कामासाठी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला होता. परिणामी, शहरातील लोकमान्यनगर, सावरकरनगर, शिवाईनगर या परिसरात तीन दिवस पाणीच नसल्याने नागरिकांचे पाण्यावाचून अक्षरशः हाल झाले. पिण्यासाठी पाणी नाही की स्वयंपाकालादेखील नाही. कपडे धुण्यासाठी नागरिकांनी पावसाच्या पाण्याचा वापर केला. कोरोनाकाळात शक्यतो बाहेर जेवायला टाळणाऱ्या नागरिकांना हॉटेलशिवाय पर्याय नव्हता. तर काही ठिकाणी विकतचे पाणी किती घेणार, असा प्रश्न नागरिकांना पडला. यादरम्यान ठाणे महापालिकेकडूनदेखील नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येत नसल्याने नागरिक अक्षरशः हवालदिल झाले होते. गुरुवारी संध्याकाळी हे काम झाल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरू झाला. तर शनिवारी सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठा बंद असला तरी, स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा या दरम्यान सुरू होता. तसेच मुंबई महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठादेखील सुरू होता. त्यामुळे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवाडा, मानपाडा, कोठारी कम्पाउंड, पवारनगर, आझादनगर या भागात फारसा परिणाम दिसून आला नाही. तसेच नौपाडा, कळवा, साकेत, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इंटरनिटी, समतानगर व मुंब्य्राच्या काही भागाचा पाणीपुरवठादेखील सुरू होता, असा दावा महापालिकेने केला आहे.