ठाणे : येथील जिल्हा रूग्णालय ब्रिटीशकालीन आहे. प्राचिनकाळी दगडी बांधकाम केलेल्या या रूग्णालयाच्या दोन इमारतींना ‘ऐतिहासीक वास्तु’चा दर्जा पुरातत्व विभागाने दिलेला आहे. मात्र आता या जागेवर राज्य शासनाकडून ९०० खाटांचे अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात येत आहे. त्यासाठी या इमारतीं पाडल्यात जात असल्यामुळे त्यांच्या रूपाने ठाणेकरांचा हा ऐतिहासीक ठेवा नामशेष होत आहे.
या जिल्हा शासकीय रूग्णालात सध्या ३६७ खाटा आहेत. स्मार्ट सिटीचा दर्जा प्राप्त झालेल्या या ठाणे शहरातील आरोग्याची गरज लक्षात घेऊन त्यास साजेशे रूग्णालय बांधण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. त्यानुसार ५२७ कोटी खर्चाचे अत्याधुनिक ‘मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ उभे केले जात आहे. त्यासाठी सध्याचे या रूग्णालयाच्या इमारती पाडण्यास प्रारंभ झाला आहे. या कामासाठी दगडी भिंतीच्या दोन इमारती प्रथम पाडण्यास प्रारंभ केला आहे. ब्रिटीश कालावधीसह त्या आधीच्या राजे, महाराजेच्या सत्तेच्या पाऊल खुणांच्या साक्षिदार या इमारती आहेत. त्यामुळे त्यास पुरातत्व विभागाने ‘ऐतिहासीक वास्तु’ म्हणजे ‘हेरिटेज’दर्जा दिला आहे. पण आता ठाणेकरांचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या या इमारती नामशेष होत असल्याची हळहळ ठाणेकरांनाकडून ऐकवली जात आहे.
ब्रिटीश काळी ठाणेकरांच्या आरोग्याची गैरसोय दूर करण्यासाठी दानशुर विठ्ठल सायन्ना, यांनी या इमारतींसह संपूर्ण जागा रूग्णालयासाठी दान केलेली आहे. १९३५मध्ये या रूग्णालयाच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला. तत्पुर्वी १९३२मध्ये सायन्ना यांचे निधन झाले असता त्यांच्या मुलाने वडिलांच्या शब्दास जागून त्यांच्या स्मरणार्थ रूग्णालय नावारूपाला आणले. जिल्हा शासकीय रूग्णालयाचा दर्जा (सिव्हील) असलेल्या या रूग्णालयाच्या जागेवर आता भव्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम हाती घेतले आहे. ३६७ खाटाचे हे रूग्णालय आता थेट ९०० खाटांचे अत्याधुनिक रूग्णालय ठाणेकरांच्या सेवेत उभे करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी ठाणेकरांचा हा ‘हेरिटेज’ ठेवा नामशेष होत असल्याचे वास्तव नाकारले जात नाही.