n लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे यंदा सर्वच सण-उत्सव साजरे करताना नागरिकांनी सामाजिक भान जपलेले आहे. दिवाळीदरम्यानही ठाणेकरांनी यंदा हे सामाजिक भान राखलेले दिसले. यंदा ठाण्यात दिवाळीच्या चार दिवसांत झालेल्या हवा आणि ध्वनिप्रदूषणात गेल्या दोन वर्षींच्या तुलनेत काही प्रमाणात घट झालेली आढळली. गेल्या दोन वर्षांची तुलना करता धूलिकणांचे प्रमाण ४४ टक्क्यांपर्यंत कमी आढळले, ध्वनी पातळीत २१ ते २९ टक्के इतकी घट झालेली दिसली. तर हवेच्या गुणवत्तेतही ३७ टक्के इतकी सुधारणा झाली.ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे दीपावलीपूर्व व दीपावली काळात हवा, ध्वनी यांची गुणवत्ता तपासली जाते. दिवाळीचे आठ दिवस आधी हवेतील धूलिकणांचे प्रमाण १२६ मायक्रोग्राम होते. दिवाळीत लक्ष्मीपूजनादिवशी ते १३३ मायक्रोग्राम होते. मात्र गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ते ४४ टक्क्यांपर्यंत कमी आढळले. ध्वनीची तीव्रता ही दिवाळीपूर्वी ६९ डेसिबल होती ती लक्ष्मीपूजनादरम्यान ७२ डेसिबल इतकी आढळली. मात्र गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ध्वनिपातळीतही सुमारे २९ टक्के घट झाली तर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. यंदा एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साजरे करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेद्वारे दीपावलीसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. त्याआधारे आणि एकूणच परिस्थितीचे भान राखत ठाणोकरांनी फटाके कमी फोडले. तसेच यंदा दिवाळीनिमित्त पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या घरी जाण्याचे टाळून घरच्याघरीच दिवाळीचा सण साजरा केला.नियम मोडणाऱ्या ४६ जणांवर मीरा-भाईंदरमध्ये गुन्हे दाखलमीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये रात्री ८ ते १० असे दोन तासच फटाके फोडण्यास परवानगी असताना त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. फटाके फोडणाऱ्यां विरुद्ध शहरातील सहा पोलीस ठाण्यात ४६ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात ६४ आरोपी आहेत. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी ही बाब गांभीर्याने घेत मीरा- भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना कारवाईचे निर्देश दिले होते. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या अखत्यारितील भाईंदर पोलीस ठाण्यात सर्वाधिक ३० आरोपींविरुद्ध २० गुन्हे दाखल झाले आहेत . तर नवघर पोलीस ठाण्यात ११ आरोपी विरुद्ध ९ गुन्हे, मीरा रोड १० आरोपींविरुध्द ६ गुन्हे, काशिमीरा पोलीस ठाण्यात ५ आरोपींविरुद्ध ३ गुन्हे, नयानगर पोलीस ठाण्यात ७ आरोपीं विरोधात ७ गुन्हे, उत्तन सागरी पोलीस ठाण्यात १ गुन्हा असे ४६ गुन्हे दाखल झाले आहेत.
ठाणेकरांची दिवाळी सामाजिक भानाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 1:28 AM