लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरातील ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात नुकताच चार दिवस द्राक्षे महोत्सव पार पडला. या महोत्सवात १५ हजार ६८६ किलो ताज्या द्राक्षांसह उत्तम दर्जाचे कांदे, बटाटे आणि रंगीबेरंगी कोबीची खरेदी चोखंदळ ठाणेकर ग्राहकांनी केली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना रोख रकमेचा लाभ झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केल्याचे कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत श्री संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत ठाणे शहरात ठिकठिकाणी आठवडी बाजार सुरू आहे. गेल्या चार दिवसांत द्राक्षे महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी ताजी रसाळ द्राक्षे, कांदा, भाजीपाल्यासह बटाटे, कोबी आदींची ठाणेकरांना स्वस्तात विक्री केली.
बाजारात १५० ते १६० रुपये किलो मिळणारे द्राक्षे या महोत्सवात अवघ्या १२५ ते १३० रुपये दराने ठाणेकरांनी खरेदी केले आहे. यामध्ये काळ्या द्राक्षाच्या वाणासह सोनाका, फामी, नानासाहेब परपळ आदी द्राक्षांचे वाण खरेदी केले. ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान पार पडलेल्या या द्राक्षे महोत्सवात हिरव्या व काळ्या रंगाच्या पाच हजार किलो द्राक्षांची विक्री झाली आहे. याशिवाय दोन हजार ५० किलो फामी द्राक्षांची खरेदीही ठाणेकरांनी केली आहे. एवढेच नव्हे तर २५० ते ३०० रुपये किलो असणारा बेदाणा या महोत्सवात ठाणेकरांना अवघ्या २०० ते २२५च्या दराने खरेदी करता आला.
या महोत्सवात चार हजार ८०० किलाे द्राक्षे विकण्याचे उद्दिष्ट असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल सात हजार किलाे द्राक्षांची विक्री या बाजारात करणे शक्य झाले आहे. ठाणेकरांच्या या प्रतिसादामुळे नाशिकच्या द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या द्राक्षांच्या जोडीला ठाणेकरांनी वेगवेगळ्या रंगांच्या ९६८ किलो कोबीची खरेदी केली. याशिवाय सात हजार ५०० किलो कांदा, काकडी, वांगी, कोबी, भेंडी आणि टोमॅटोचीदेखील चोखंदळ ठाणेकर ग्राहकांनी खरेदी करून शेतकऱ्यांच्या हाती एकरकमी मोबदला दिला आहे.
...
शेतकरी प्रतिक्रिया -
भाजीपाला, फळफळावळ विकणारे अन्य राज्यांतील बहुतांश व्यापारी, किरकोळ विक्रेते अजून ठाण्यासह मुंबई शहरात दाखल झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा ग्राहक या आठवडी बाजाराच्या माध्यमातून सध्या सहज मिळवता येत आहे. या ग्राहकांची ओढ कायम ठेवण्यासाठी व व्यापाऱ्यांचा अडथळा न ठेवता शेतकऱ्यांना त्याच्या मालाची विक्री करण्यासाठी शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, बाजारपेठांजवळची मैदाने, शासकीय कार्यालयाच्या आवारात द्राक्षांसह ताज्या भाजीपाल्याच्या विक्रीला संधी देणे अपेक्षित आहे.- प्रकाश महाले, पिंपळगाव बसवंत, नाशिक
.............