प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: संगीतभूषण पं. राम मराठे यांचा नातू युवा गायक भाग्येश मराठे याच्या गाण्याने सुरू झालेल्या २८व्या पं. राम मराठे संगीत समारोहाचा कळसाध्याय डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे आणि पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘जसरंगी’ या अनोख्या कार्यक्रमाने रविवारी रात्री लिहिला गेला. एकाहून एक अप्रतिम कलाविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. महोत्सवात झालेल्या ‘संगीत मंदारमाला’ या नाटकाच्या प्रयोगास रसिकांची हाऊसफुल्ल उपस्थिती होती.
ठाणे महानगरपालिका आयोजित संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे यंदाचे २८ वे वर्ष होते. पहिल्या दिवसाची सांगता झाली ती ज्येष्ठ सतार वादक उस्ताद सुजात खान यांच्या सतार वादनाने. त्यांना अमित चौबे आणि सपन अंजारिया यांची तबला साथ होती. दुसऱ्या दिवशी, सोलापूरहून आलेल्या जाधव कुटुंबियांनी सुंद्री वादनाचा अनोखा आविष्कार सादर केला. दुसऱ्या सत्रात, अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. तबला साथ पं. मुकुंदराज देव यांची होती. तर, वैष्णवी देशपांडे (पढंत), वैभव मांकड ( हार्मोनियम/गायन), संकेत नातू (बासरी) हे त्यांचे साथीदार होते.
या दिवसाची सांगता शुभा मुद्गगल यांच्या दैवी गायनाने झाली. रविवारी, महोत्सवाच्या सांगतेला पहिल्या सत्रात शाश्वथी चव्हाण यांचे गायन होते. तसेच, मंजिरी वाठारे यांचे कथ्थक नृत्य सादर झाले. महोत्सवाची सांगता डॉ. अश्विनी भिडे देशपांडे आणि पं. संजीव अभ्यंकर यांच्या 'जसरंगी' या पं. जसराज यांच्या शैली व मांडणीच्या गानप्रकारांनी झाली. त्याचे विवेचन पं. संजीव अभ्यंकर यांनी केले. मैफलीची सांगता मराठी आणि हिंदी भजनाने करून त्याचाही एक सर्वस्वी वेगळा अनुभव रसिकांना दिला.