ठाणे : उन्हाळी सुट्टीत ‘मामाच्या गावाला जाऊ या’ चा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांत मागे पडला. दिवसेंदिवस उकाडा असह्य होत असल्याने सुट्टी अविस्मरणीय करण्यासाठी बहुतांश पर्यटक बर्फाच्छादीत प्रदेशाला पसंती देत आहे. यंदा ठाणेकरांनी हिमाचल प्रदेशसह सिक्कीम, दाजिर्लिंग या ठिकाणांना पसंती दिली आहे. त्याचवेळी ठाणेकरांचा कल परदेशी सहलींकडेही कायम आहे, असे विविध सहलीच्या आयोजकांनी ‘लोकमत’ला सांगितले. परीक्षा संपली, की वेध लागतात उन्हाळी सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाण्याचे. पूर्वी ही सुट्टी गावी घालवण्याकडे कल असे. मात्र आधी भारनियमन, नंंतर वाढती पाणीटंचाई आणि सध्या असह्य होत गेलेला उन्हाळा यामुळे हा ट्रेण्ड बदलतो आहे. पर्यटक गावी किंवा जवळपास फिरायला न जाता महाराष्ट्राबाहेर किंवा परदेशात जाण्यास पसंती देत आहेत. उन्हाळी सुट्टी साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होते. ते गृहीत धरून पर्यटकांचे प्लॅन जानेवारीपासूनच सुरू होतात. रेल्वे रिझर्व्हेशनची वाढलेली मर्यादा आणि विमानाची तिकीटे लवकर बुक केली तर मिळणारी सवलत यामुळे हे प्लॅन हल्ली साधारण तीन महिने आधी तयार होतात. काही जण तर सहा महिने आगाऊ बुकिंग करतात. एप्रिल - मे महिन्यात जाणवणारा उकाडा पाहता थंड हवेच्या ठिकाणी जाऊन निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी हल्ली पर्यटक आतूर असतात, असे टूर आॅपरेटर्सनी सांगितले. प्रत्येक जण बजेटनुसार स्थळांची निवड करीत असतो. ज्यांचे बजेट अधिक असते, ते परदेशातही फिरुन येतात; तर अनेक जण भारतातील थंड हवेच्या ठिकाणी फिरण्याला पसंती देतात. दोन वर्षांपूर्वी अधिकाधिक ठाणेकरांनी परदेशी सहलींना पसंती दिली होती. गेल्यावर्षी हा ट्रेण्ड कमी झाला होता. सहलीच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलर आणि युरोच्या वाढत्या दरामुळे गेल्यावर्षीची मे महिन्याची सुट्टी भारतातल्या थंड हवेच्या ठिकाणी घालविण्यावर पर्यटकांनी भर दिला आहे. त्यातही काश्मीरला जाण्याचा कल सर्वाधिक असल्याने सुट्टीत सहलींना जाणाऱ्यांपैकी ६५ ते ७० टक्के ठाणेकरांनी त्यावेळी काश्मीरचे बुकिंग केले होते. या काळात देशांत फिरण्यासाठी सिमला, मनाली, सिक्कीम, दार्जिलिंग, नैनीताल, शिलाँग, मेघालय, उटी, म्हैसूर; तर परदेशात युरोप, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलँड यासारख्या ठिकाणांना पर्यटकांची पसंती असते. गेल्यावर्षी काश्मीरला पसंती देणारे ठाणेकर यंदा मात्र पुन्हा परदेशी सहलींकडे वळले आहेत. शिवाय देशांतर्गत फिरण्यासाठी त्यांचा कल हिमाचल प्रदेश, सिक्कीम, दाजिर्र्लिंगला आहे. या पर्यटनस्थळांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात केले गेले आहे. ज्यांचे बजेट अधिक आहे त्यांनी परदेशात खास करून युरोपची निवड केली आहे आणि त्याखालोखाल सिंगापूर, मलेशिया, थायलंड यासारख्या स्थळांना पसंती दिली आहे. अलिकडे लेह- लडाख या पर्यटनस्थळांविषयीही पर्यटकांमध्ये वाढती क्रेझ आहे. तेथेही ठाणेकरांचा कल असल्याचे सहल आयोजकांनी सांगितले. (प्रतिनिधी)यंदा जितका देशांतर्गत फिरण्याकडे ठाणेकरांचा कल आहे, तितकीच पसंती त्यांनी परदेशात फिरण्यासही दिली आहे. - मयुरा बेलवले, वीणा वर्ल्डउन्हाळ््यात पर्यटक थंड हवेच्या ठिकाणांनाच प्राधान्य देतात. मध्य एप्रिल ते मे महिन्याच्या शेवटापर्यंतच्या कालावधीत फिरायला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच यंदा परदेशात फिरायला जाणाऱ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढली आहे. फिरायला जाणाऱ्यांमध्ये कुटुंबांसह नव्या जोडप्यांचाही समावेश आहे. - सिद्धीका लोटलीकर, बिन्द्रा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सकाश्मीरमधील सध्याचे वातावरण पाहता पर्यटक तेथे जाण्याची शक्यता खूप कमी आहे. साधारणत: काश्मीरला पसंती देणाऱ्या पर्यटकांनी यंदा आपला मोर्चा सिक्कीम-दाजिर्लिंगकडे वळविला आहे. देशांतर्गत फिरण्याची स्थळे ही दरवर्षी बदलत असली, तरी परदेशातील स्थळांची निवड मात्र फारशी बदलत नाही. युरोपला दरवर्षीच पर्यटकांची पसंती असते.- कौस्तुभ जोशी, हार्मनी
ठाणेकरांची सुट्टी बर्फाच्छादीत प्रदेशात
By admin | Published: April 11, 2017 2:27 AM