ठाणे : मुंबईकरांना मिळालेल्या दिलाशाप्रमाणे ठाणेकरांना मालमत्ता करात यंदा कोणतीही वाढ नको आहे. तशी मागणी आता पुढे येत आहे.ठाणे महापालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत हा मालमत्ता कर आहे. परंतु ठाण्यामध्येही यापूर्वीच ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ झालेला आहे. त्यामुळे पालिकेवर जवळजवळ १०० कोटींचा बोजा पडला आहे.
महापालिकेचे उत्पन्न वाढताना दिसत नाही. महापालिकेच्या तिजोरीत आता जेमतेम १२ ते १५ कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यात आता सातवा वेतन आयोग सर्वच कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना लागू झाला आहे. त्यामुळे यापोटीदेखील पालिकेच्या तिजोरीवर १०० ते १५० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे महापालिका नव्या आर्थिक वर्षात काही करांमध्ये वाढ करू इच्छिते. मात्र, आता मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका काय प्रस्ताव देते, याकडे लक्ष लागले आहे.