मागील काही वर्षांत ठाण्याचा झपाट्याने विकास झालेला आहे. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून पार्किंगची समस्या भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. मागील कित्येक वर्षांपासून ठाणेकरांना पार्किंग करण्याकरिता स्टँड उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला गाडी लावली तर त्यावर कारवाई होऊन पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंड सहन करावा लागत आहे. कित्येक वर्षांपासून पार्किंग धोरण अद्यापही अंतिम झालेले नाही.
दरवर्षी खड्ड्यांची समस्या
ठाण्यातील रस्त्यांची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. दरवर्षी पावसाळा आला की रस्त्यांवर खड्डेच खड्डे अशी स्थिती दिसून येते. याच खड्ड्यांवरून दरवर्षी आंदोलन केले जाते. मात्र, त्यावर यशस्वी तोडगा काही प्रशासन किंवा सत्ताधाऱ्यांना काढता आलेला नाही. दरवर्षी खड्ड्यांवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे.
पाणी पाणी रे...
ठाणे महापालिका स्थापन झाल्यापासून अद्यापपर्यंत ठाणेकरांना हक्काचे धरण काही मिळू शकलेले नाही. उन्हाळा सुरू होताच, ठाणेकरांना दरवर्षी पाणीकपातीच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पाणी खरेदीवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे; परंतु अद्यापही हक्काचे धरण सत्ताधारी किंवा विरोध करणाऱ्यांना एकत्र बसून घेता आलेले नाही.