प्रज्ञा म्हात्रे ठाणे : दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याने प्रत्येक घरासमोरचा परिसर उजळवून टाकणाºया रंगीबेरंगी कंदिलांची खरेदी हा चिकित्सक, चोखंदळपणा ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आकाशकंदिलांनी ठाण्यातील दुकाने, बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, सध्या ठाणेकरांना भुरळ घातली आहे, ती अनोख्या ‘एलियन कंदिलां’नी.दिवाळी सण एका आठवड्यावर आला आहे. कपडे, फराळ, पणत्या, रांगोळीच्या खरेदीला हळूहळू सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यापासून विक्रीसाठी कंदील उपलब्ध झाले आहेत. मात्र, आता खºया अर्थाने कंदिलांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. ठाणेकरांनी ‘इको फ्रेण्डली’ ही संकल्पना गेल्या काही वर्षांपासून अमलात आणली असल्याने ‘इको फ्रेण्डली कंदिलां’ची मागणी वाढू लागली आहे. अगदी परदेशातही ठाण्याच्या इको फ्रेण्डली कंदिलांना पसंती दिली जाते. ठाण्यातील कलाकार कैलाश देसले हे दरवर्षी दिवाळीनिमित्त इको फ्रेण्डली कंदिलांचे नवनवीन प्रकार ठाणेकरांसाठी तयार करतात. यंदा त्यांनी ‘एलियन’ हा कंदील तयार केला आहे. केवळ बांबू आणि कपड्यापासून तो तयार करण्यात आला आहे. या कंदिलास प्रचंड मागणी आहे. एकाच आकारात आणि रंगात हा कंदील तयार केला आहे. लहान मुलांच्या नजरेस हा कंदील पडल्यावर ते त्याच्या खरेदीचा हट्ट धरतात, त्यामुळे बहुतांश पालक या कंदिलाची खरेदी करत असल्याचे देसले यांनी सांगितले. या कंदिलाबरोबर चटईच्या पणत्या, पतंग, चटईचे झुंबर, बॉल, स्टार, मटकी आणि दरवर्षी तुफान मागणी असणारे पारंपरिक कंदील बाजारात उपलब्ध आहेत. यंदा पणत्यादेखील वेगळ्या प्रकारच्या पाहायला मिळत आहे.